राज ठाकरे आले अन् अविनाश जाधवांचं उपोषण सुटले; टोल दरवाढीवरून सरकारला इशारा
By जितेंद्र कालेकर | Published: October 8, 2023 02:07 PM2023-10-08T14:07:33+5:302023-10-08T14:08:27+5:30
युतीने दिलेल्या टोलमुक्तीच्या आश्वासनाचे काय झाले?: टोलवाढीबाबत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची घेणार भेट
ठाणे - टोल बंद करण्यासाठी मनसेने आतापर्यंत अनेक आंदोलने करून अधिकृत आणि अनधिकृत असे जवळपास ६७ टोल नाके बंद केले. शिवसेना भाजपने त्यांच्या जाहीरनाम्यात टोलमुक्तीचे आश्वासन दिले होते, त्याचे काय झाले, असा प्रश्न महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी उपस्थित केला आहे. टोलवाढी संदर्भात येत्या चार दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असून त्यानंतरही सकारात्मक निर्णय झाला नाहीतर मात्र गांधीवादी मार्गाने नव्हे तर मनसे स्टाईलने आंदोलन केले जाईल. त्याबाबतची भूमिका लवकरच जाहीर करणार आल्याचे राज ठाकरे यांनी रविवारी स्पष्ट केले.
टोलदरवाढी विरोधात मनसेचे ठाणे आणि पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव हे गेल्या चार दिवसांपासून ठाण्याच्या वेशीवरील मुलूंड टोलनाका येथे आमरण उपोषणाला बसले होते. रविवारी सकाळी १०.४५ वाजण्याच्या सुमारास मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आंदोलनस्थळी जाऊन अविनाश जाधव यांच्यासह आंदोलनकर्त्यांची भेट घेतली. त्यानंतर त्यांनी ठाण्याच्या शासकीय विश्रामगृहात पत्रकार परिषद घेऊन आपली भूमिका स्पष्ट केली. ठाण्यातील उपोषणाची माहिती घेतल्यानंतर उपोषण हे आपले काम नसल्याचे अविनाश जाधव यांना सांगितल्याचे राज ठाकरे यांनी यावेळी सांगितले. ते पुढे म्हणाले, मनसेने आंदोलने करुन ६५ ते ६७ टोल नाके बंद केली.
शिवसेना भाजपच्या जाहीरनाम्यात टोल नाके बंद करू, असे आश्वासन दिले होते. २०१४ आणि २०१७ ला सुद्धा त्यांनी हे सांगितले होते. पण आम्हाला टोल नाक्याचे काय झाले? हे विचारले जाते. मात्र टोलमुक्तीची घोषणा करणाºयांना कोणी प्रश्न विचारत नाही.मोपलवारांशी बोलणे झाले, २००२ ला अॅग्रीमेंट झाले. त्यावर पैसे उचलल्याचे ते म्हणाले. जो पेडर रोड झाला नाही त्याचेही पैसे घेतले जात असल्याचा आरोप ठाकरे यांनी यावेळी केला. रस्ते व्यवस्थित बांधले जात नसतील तर टोल कशाला? म्हैसकर हे कोणाचे लाडके आहेत. एकनाथ शिंदे यांनी टोल संदर्भात याचिका का मागे घेतली? असे प्रश्नही त्यांनी उपस्थित केले. जे पिळवणूक करतात, लोकं त्यांनाच मतदान करतात, असा संतापही त्यांनी यावेळी व्यक्त केला.
टोलच्या दर वाढी विरोधात सुरु असलेल्या ठाण्याच्या आनंद नगर चेक नाक्यावरील महाराष्ट्र नवनिर्माण सेनेच्या उपोषणकर्त्यांची आज अध्यक्ष राज ठाकरे यानी भेट घेतली . (व्हिडिओ : विशाल हळदे)#MNS#rajthackeraypic.twitter.com/JNBwex4187
— Lokmat (@lokmat) October 8, 2023
उपोषण मागे घ्यायला लावले
येत्या चार दिवसांत मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांची भेट घेणार असल्याचे राज ठाकरे यांनी जाहीर केले. त्यामुळे आंदोलन मागे घेण्यास सांगितल्याचेही त्यांनी स्पष्ट केले. मुख्यमंत्री यांच्या भेटीनंतरच आता आंदोलनाची पुढची दिशा ठरणार आहे. मुख्यमंत्री ठाण्याचेच असल्यामुळे सकारात्मक निर्णय होण्याची अपेक्षा आहे. तसा झाला नाही तर पुढचे आंदोलन गांधीवादी मार्गाने नव्हे तर मनसे स्टाईलने असेल, असा इशाराही त्यांनी यावेळी दिला. निवडणूका येतायेत, मुख्यमंत्र्यांनाही पुन्हा उभे रहायचे आहे. त्यांनाही याचा त्रास होऊ शकतो, असेही ते म्हणाले. यावेळी दोस्ती, लोढा, हिरानंदानी कॉम्पलेक्समधील रहिवाशांनीही टोल मुक्तीसाठी राज ठाकरे यांची भेट ष्घेतली.
उपोषणाची सांगता..
राज ठाकरे यांनी व्यासपीठावर जाऊन अविनाश जाधव यांना उपोषणाची सांगता करण्यास सांगितले. त्यानंतर जाधव यांच्यासह ओवळा माजीवडा उपशहर प्रमुख पुष्कर विचारे यांनीही या उपोषणाची सांगता केली. यावेळी मनसेचे नेते अमित ठाकरे, अभिजित पानसे, आमदार राजू पाटील, रवीद्र मोरे आणि बहुसंख्येने मनसैनिक उपस्ति होते.