ते आले, उमेदवाराने अर्ज भरला, ते गेले; राज ठाकरे यांनी पुन्हा केला मनसैनिकांचा हिरमोड
By अजित मांडके | Published: October 25, 2024 07:35 AM2024-10-25T07:35:54+5:302024-10-25T07:38:39+5:30
शरद पवारांची मात्र मुंब्रा-कळव्यात भर उन्हात उघड्या गाडीतून फेरी
अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे: मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा ठाण्यातील मनसैनिकांचा गुरुवारी हिरमोड केला. ठाण्यात मनसेचे उमेदवार अविनाश जाधव यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी राज रॅलीत सहभागी होणार म्हणून मनसैनिक सकाळी १० वाजल्यापासून ताटकळले होते. मात्र ठाण्यातील एका पंचतारांकित हॉटेलमध्ये फ्रेश झाल्यानंतर राज काळ्या काचेच्या गाडीतून थेट निवडणूक कार्यालयात गेले. जाधव यांनी अर्ज दाखल करताच काही मिनिटांत ते निघून गेले. काही दिवसांपूर्वी टोलमुक्तीच्या निर्णयानंतर शक्तिप्रदर्शनाची संधी साधण्यासाठी ठाण्यातील पदाधिकारी सज्ज असताना राज यांनी मिसळ आणि मिठाईवर ताव मारून मुंबईचा रस्ता धरला होता.
ठाण्यातून मनसेचे अविनाश जाधव नशीब अजमावत आहेत. राज हे जाधव यांचा अर्ज भरण्याकरिता येणार असल्याने विष्णूनगर परिसरातील मनसेच्या कार्यालयाजवळ मनसैनिकांनी १० वाजल्यापासून गर्दी केली होती. राज थोड्या वेळात येतील व जाधव यांच्या रॅलीत सहभागी होतील, असे सांगितले जात होते. रॅली संपून जाधव उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी जिल्हाधिकारी कार्यालयात गेल्यानंतर १० मिनिटांनी काळ्या काचेच्या गाडीतून राज यांनी थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठले. जाधव यांनी अर्ज भरताच राज यांच्या मोटारींचा ताफा सुसाट बाहेर पडत होता. परंतु ‘उमेदवारासोबत किमान फोटो तरी काढा’ अशी विनंती मनसैनिकांनी केल्यानंतर अखेर राज गाडीतून बाहेर आले. फोटोसेशन केले आणि पुन्हा गाडीत बसून निघून गेले. त्यामुळे पदाधिकाऱ्यांचा पुन्हा हिरमोड झाला.
शरद पवारांची भर उन्हात उघड्या गाडीतून फेरी
मुंब्रा-कळवा विधानसभा मतदारसंघाचे शरद पवार गटाचे उमेदवार जितेंद्र आव्हाड यांचा उमेदवारी अर्ज दाखल करण्यासाठी गुरुवारी शरद पवार उपस्थित होते. उघड्या गाडीतून भर उन्हात तब्बल अर्धा तास रॅलीत पवार सहभागी झाले. मात्र त्याच वेळी राज यांनी जाधव यांच्या रॅलीत सहभागी होणे टाळून एसी गाडीतून थेट जिल्हाधिकारी कार्यालय गाठल्याची चर्चा सुरू आहे.