विधानसभा लढवण्याबाबत राज ठाकरे यांची चाचपणी
By ऑनलाइन लोकमत | Updated: September 7, 2019 01:07 IST2019-09-07T01:07:04+5:302019-09-07T01:07:13+5:30
डोंबिवली दौऱ्यावर : मान्यवर, पदाधिकाऱ्यांशी करणार चर्चा

विधानसभा लढवण्याबाबत राज ठाकरे यांची चाचपणी
अनिकेत घमंडी
डोंबिवली : महाराष्ट्र नवनिर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे शनिवारी डोंबिवलीच्या दौºयावर असून ते येती विधानसभा निवडणूक ईव्हीएम मशिनद्वारे घेतली तर ती लढवायची किंवा कसे याबाबत शहरातील मान्यवरांशी चर्चा करणार असल्याचे समजते. शनिवारी सकाळी पुण्याहून ते निघणार असून थेट डोंबिवलीत येतील अशी माहिती पक्षाचे उपाध्यक्ष राजेश कदम यांनी दिली. बदलापूर पाइपलाइन मार्गावरील कुशाला हॉटेलमध्ये ते उतरणार असून तेथेच दोन दिवस वास्तव्याला आहेत. दोन दिवसांमध्ये कल्याण डोंबिवली महापालिका स्तरावरील नगरसेवक, पदाधिकाºयांशी ते चर्चा करणार आहेत. तसेच शहरातील मान्यवरांच्या गाठीभेटी घेणार असल्याचे सांगण्यात आले. एका खासगी कार्यक्रमालाही उपस्थित राहणार आहेत.
लोकसभा निवडणुकीत राज यांच्या प्रचाराचा भाजपच्या यशावर फारसा परिणाम झाला नाही. त्यानंतर राज यांनी ईव्हीएम मशिनच्या विरोधात मोहीम सुरु केली. निवडणूक आयोगाकडे मतपेटीद्वारे निवडणूक घेण्याची मागणी केली. त्याचबरोबर या मुद्द्यावर जनमत तयार करण्याकरिता ममता बॅनर्जी यांच्यापासून शरद पवार यांच्यापर्यंत अनेक नेत्यांची भेट घेतली. मात्र निवडणूक आयोग आपली मागणी मान्य करणार नाही हे लक्षात आल्यावर राज यांनी निवडणूक जर फिक्स असेल तर कशाला लढवायची, असे सूचक विधान अलीकडेच पक्षाच्या मेळाव्यात करुन विधानसभा निवडणूक न लढवण्याचे संकेत दिले होते.
राज हे सातत्याने घेत असलेल्या सरकार विरोधी भूमिकेच्या पार्श्वभूमीवर अलीकडेच ईडीच्या चौकशीला त्यांना सामोरे जावे लागले. पक्षाचे नेते नितीन सरदेसाई यांनाही ईडीने चौकशीला बोलावले. युती तुटली तर शिवसेनेला रोखण्याकरिता मनसेचे उमेदवार रिंगणात असणे ही भाजपची गरज असू शकते. समजा युती झाली तरीही शिवसेनेला मागील वेळी युती तुटल्याचा लाभ झाला तसा तो होऊ नये याकरिता मनसे फॅक्टर भाजपच्या कामी येऊ शकतो. राज यांनी भाजपवर टीका करताना शिवसेनेच्या उमेदवारांच्या विरोधात निवडणूक लढवली तर त्यांच्या मागे लागलेले चौकशीचे शुक्लकाष्ठ थांबू शकते. त्यामुळे भाजप विरोधाची धार कमी न करता राज यांनी भाजपला अनुकूल राजकीय खेळी खेळावी, अशी भाजपच्या चाणक्यांची इच्छा असल्याचे कळते. भाजपमध्ये अन्य पक्षातून आलेल्या एका नेत्याने निवडणूक लढवण्याचा प्रस्ताव राज यांच्यापुढे ठेवल्याचे समजते.
भाजपवर तोंडसूख घेत असलेल्या राज यांनी शिवसेनेला अपशकुन करण्याची फारशी उत्सुकता दाखवली नव्हती, असे कळते. त्यानंतरच चौकशीचे लचांड त्यांच्या मागे लागले, असे मनसेच्या एका नेत्याने नाव जाहीर न करण्याच्या अटीवर सांगितले. लोकसभेला ‘इस बार ३०० पार’ अशी घोषणा केलेल्या भाजपला विधानसभेत स्वबळावर २०० जागा मिळवायच्या आहेत. तसे झाल्यास शिवसेनेचा खोकला सुंठीवाचून जाणार आहे. त्यामुळे या यशाकरिता सर्व शक्यता भाजप अजमावत आहे, असे भाजपच्याच एका नेत्याने खासगीत सांगितले. राज हे समाजातील मान्यवर व पदाधिकारी यांची मते जाणून घेणार आहेत.