आत्महत्या करणं चुकीचंच, पण राज ठाकरे भाग्यवान नेते; जितेंद्र आव्हाडांचा 'पक्षबदलू' नेत्यांना टोला
By ऑनलाइन लोकमत | Published: August 21, 2019 02:45 PM2019-08-21T14:45:45+5:302019-08-21T14:45:57+5:30
मनसेप्रमुख राज ठाकरे यांना कोहिनूर मिल व्यवहारप्रकरणी ईडीने नोटीस पाठवल्याने मनसैनिकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे.
ठाणेः मनसेप्रमुख राज ठाकरे यांना कोहिनूर मिल व्यवहारप्रकरणी ईडीने नोटीस पाठवल्याने मनसैनिकांमध्ये प्रचंड संतापाचे वातावरण आहे. राज ठाकरेंना चौकशीसाठी बोलावण्यात आल्याने ठाण्यात एका मनसैनिकाने पेटवून घेत आत्महत्या केल्याचे वृत्त आहे. प्रवीण चौगुले असे या आत्महत्या करणाऱ्या मनसैनिकाचे नाव आहे. त्यावरून आता राष्ट्रवादीचे जितेंद्र आव्हाड यांनीही सरकारवर निशाणा साधला आहे. ते म्हणाले, खरं तर आत्महत्या करणं चुकीचे आहे, पण अशा परिस्थितीत काही जण राजकारणात निष्ठेची विष्ठा करताना दिसताहेत. 40-50 वर्षे ज्यांची खानदानं सत्तेत होती ते सत्तेच्या लाचारीसाठी इथे तिथे जाताना दिसताहेत.
पण कळव्यातील प्रवीण चौगुलेने राज ठाकरे यांच्या निष्ठेपायी आत्महत्या केली, कळव्यातील प्रवीण चौगुले हा कार्यकर्ता केवळ राज ठाकरेंना ईडीची नोटीस आल्यानं अस्वस्थ होता. माझ्या नेत्यासाठी मी जीव द्यायला तयार आहे, असे कुठेच दिसत नाही. दररोज सकाळी दुर्बिण लावून शोधावे लागते कुठले कार्यकर्ते कुठे गेलेत. सत्ता येणार नाही, नगरसेवक होणार नाही हे माहीत असतानाही नेत्याच्या प्रेमापोटी जीव देणं हे काही सोपं नाही. राज ठाकरेंसारख्या भाग्यवान नेत्याला सलाम, हे भाग्य फार लोकांच्या नशिबी येत नाही. नेत्यासाठी कार्यकर्ता प्राण पणाला लावेल हे आजच्या काळात काही वेगळंच वाटतं, असंही आव्हाड म्हणाले आहेत.
तर दुसरीकडे मनसेचे नेते संदीप देशपांडे यांनीही या प्रकरणावर प्रतिक्रिया दिली आहे. प्रवीणची आत्महत्या महाराष्ट्राला चटका लावणारी आहे. प्रवीण भाजपाच्या घाणेरड्या राजकारणाचा बळी आहे. कार्यकर्त्यांनी संयम राखावा अन् कोणतेही टोकाचे पाऊल उचलू नये, ही मी विनंती करतो, असंही संदीप देशपांडे म्हणाले आहेत. महाराष्ट्र सैनिक प्रवीणचे भाऊ आहेत ते सर्व त्याचे पुढील संस्कार करतील, असंही देशपांडेंनी सांगितलं आहे.