राज ठाकरेंनी ठाण्यात ‘पायधूळ’ झाडली, पंधरा मिनिटांची भेट
By ऑनलाइन लोकमत | Published: April 28, 2019 04:35 AM2019-04-28T04:35:14+5:302019-04-28T04:35:45+5:30
ते आले, चहा प्यायले आणि निघाले, कार्यालयातील बंद दाराआड घेतली माहिती
ठाणे : लोकसभा निवडणुकीच्या निमित्ताने मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी ठाण्यात प्रचारसभा घ्यावी, अशी स्थानिक नेत्यांची इच्छा होती. मात्र, नेत्यांच्या आग्रहाखातर चौथ्या टप्प्याच्या प्रचाराचा समारोप होत असताना दुपारी राज यांनी जेमतेम १५ मिनिटांच्या भेटीत ठाण्यात केवळ पायधूळ झाडली. त्यामुळे ते आले, बसले, चहा प्यायले आणि अभिवादन करून गेले, असेच या भेटीचे वर्णन करता येईल.
राज यांनी महाराष्ट्रातील विविध ठिकाणी मोदी-शहा मुक्तीचा नारा देणाऱ्या प्रचारसभा घेतल्या. मुंबईलगतच्या ठाण्यातही त्यांची सभा होणार का, याबाबत ठाण्यातील राजकीय वर्तुळात, सर्वसामान्यांमध्ये, सोशल मीडियावरही चर्चा होती. राज यांनी ठाण्यातही सभा घ्यावी, असा स्थानिक मनसे पदाधिकाऱ्यांचा आग्रह होता. राज यांची ठाण्यात सभा होणार नसल्याचे पक्षाच्या उच्चपदस्थ नेत्यांनी ‘लोकमत’ला सांगितले होते व त्याबाबतचे वृत्त सर्वप्रथम ‘लोकमत’ने दिले होते. त्यामुळे दुधावरची तहान ताकावर भागवत पदाधिकाºयांच्या आग्रहाखातर राज यांनी ठाणे शहराला भेट देण्याचे ठरवले. ते शनिवारी सकाळी ११ वाजता ठाणे जिल्हा मध्यवर्ती कार्यालयात भेट देऊन कार्यकर्त्यांशी संवाद साधतील, असे मनसेचे ठाणे-पालघर जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी जाहीर केले. त्यामुळे सकाळपासून मनसेसैनिक कार्यालयात, तर काही पदाधिकारी कार्यकर्त्यांसह खारीगाव टोलनाका येथे राज यांच्या स्वागताकरिता उभे होते. नाशिकहून ते निघाले आहेत. असे सुरुवातील सांगण्यात आले. नंतर दुपारी १२.३० वाजता येतील, असा संदेश आला. मग, ते दुपारी ३.३० वाजता येतील, अशी माहिती पक्षाच्या पदाधिकाऱ्यांनी दिली. अखेर ते दुपारी चारनंतर ते कार्यालयात पोहोचले. त्यांच्या स्वागतासाठी महिला कार्यकर्त्या हजर होत्या. पोलिसांनीही चोख बंदोबस्त ठेवला होता.
राज यांनी अमित ठाकरे, बाळा नांदगावकर, अभिजित पानसे, अविनाश जाधव यांच्यासोबत चर्चा केली. कार्यकर्ते, पत्रकार केबिनच्या बाहेर ताटकळत उभे होते. मनसेच्या छोटेखानी मध्यवर्ती कार्यालयात गर्दीमुळे उकाडा वाढला. राज काहीतरी बोलतील, याची सर्वांना उत्सुकता होती. बंद दाराआड राज यांनी ठाणे जिल्ह्यातील ठाणे, कल्याण व भिवंडी लोकसभा मतदारसंघांतील राजकीय वातावरणाची नेत्यांकडून माहिती घेतली. ठाण्यातील राष्ट्रवादी काँग्रेस आघाडीचे उमेदवार आनंद परांजपे यांच्या प्रचाराविषयी त्यांनी विचारणा केली असल्याचे जाधव यांनी ‘लोकमत’ला सांगितले.
जेमतेम १० ते १५ मिनिटांनी राज केबिनच्या बाहेर आले. त्यांना भेटण्यासाठी कार्यकर्त्यांची झुंबड उडाली. त्याचवेळी पत्रकार प्रश्न विचारण्यास पुढे सरसावले असता त्यांनी नकारार्थी मान डोलवली आणि ते बाहेर पडले. गाडीत जाण्याआधी त्यांनी उपस्थित कार्यकर्त्यांना अभिवादन केले आणि ते निघून गेले. प्रचारसभा नाही पण किमान राज यांनी ठाण्यास भेट दिली याचे समाधान मनसे पदाधिकाऱ्यांच्या चेहऱ्यावर होते.