राज ठाकरे ठाणे आणि पालघर जिल्ह्याच्या दौऱ्यावर, चार दिवस घेणार विविध मतदार संघांची झाडाझडती
By अजित मांडके | Published: May 11, 2023 06:20 PM2023-05-11T18:20:40+5:302023-05-11T18:22:09+5:30
यात मनसेच्या काही कार्यालयांचा शुभांरभ, बाईक रॅली, काहींचे पक्ष प्रवेशही यावेळी होणार आहेत. त्यामुळे आता ते या तीन दिवसात कोणा कोणाचा समाचार घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
ठाणे : कोकण दौरा आटोपल्यानंतर मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी पुन्हा एकदा ठाणे जिल्ह्याकडे कुच केल्याचे दिसत आहे. त्यानुसार शुक्रवार ते सोमवार असे चार दिवस आता ठाणे जिल्ह्याच्या दौऱ्यावर येणार आहेत. या तीन दिवसीय दौऱ्यात ठाणे, मिरा भाईंदर, वसई विरार, नालासोपारा, भिवंडी, शहापुर, अंबरनाथ, बदलापूर, उल्हासनगर, कल्याण, डोंबिवली, नवी मुंबईचा दौरा करणार आहेत. यात विविध विधानसभा मतदार संघानिहाय ते मोर्चे बांधणी करणार असून येथील पदाधिकाऱ्यांशी चर्चा करणार आहेत. त्यातही यात मनसेच्या काही कार्यालयांचा शुभांरभ, बाईक रॅली, काहींचे पक्ष प्रवेशही यावेळी होणार आहेत. त्यामुळे आता ते या तीन दिवसात कोणा कोणाचा समाचार घेणार हे पाहणे महत्वाचे ठरणार आहे.
मागील काही महिन्यांपासून मनसे ठाण्याकडे आपले लक्ष केंद्रीत केल्याचे दिसत आहे. त्यानुसार राज ठाकरे यांनी मागील काही महिन्यात ठाण्यात चार ते पाच वेळा हजेरी लावली आहे. दोन वेळा सभा देखील घेतल्या आहेत. तर कार्यकर्त्यांशी चर्चा देखील केल्या आहेत. त्यानंतर आता पुन्हा आता केवळ ठाणे नाही तर ठाणे जिल्हा आणि पालघर जिल्हा पिंजुन काढण्यासाठी शनिवार ते सोमवार तळ ठोकून असणार आहे. सध्या ठाण्यासह जिल्ह्यात शिवसेनेत दोन गट पडलेले आहेत. त्यामुळे मतांचे देखील विभाजन झाले आहे. तसेच कॉंग्रेस आणि राष्ट्रवादीची अवस्था देखील जिल्ह्यात फारशी चांगली असल्याचे दिसत नाही. त्यामुळे त्याचा फायदा घेण्यासाठी मनसेने आता कंबर कसल्याचे दिसत आहे. मतदारांना पर्याय म्हणूनही मनसे पुढे येत आहे. त्यातही राज ठाकरे हे वारंवार आता जिल्ह्यात येत असल्याने मनसेच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांना, कार्यकर्त्यांना देखील यामुळे बळ मिळणार असल्याचे बोलले जात आहे.
त्यानुसार या दौऱ्याकडे सर्वांचेच लक्ष लागणार आहे. या दौऱ्यात पहिल्या टप्यात शुक्रवारी मिरारोड, भाईंदर येथे भेटीगाठी बाईक रॅली, १४५ आणि १४६ विधानसभा मतदार संघातील पदाधिकाऱ्यांच्या भेटी गाठी, कार्यालयाचा शुभारंभ, त्यानंतर दुपारीच वसईकडे प्रस्थान केले जाणार आहे. त्यानंतर वसई, नालासोपारा येथील मतदार संघाचा देखील ते जायजा घेणार आहेत. येथील दोन विधानसभा मतदार संघाच्या परिस्थितीचा आढावा ते घेणार आहेत. त्यानंतर शनिवारी पालघरमधून थेट भिवंडीकडे रवाना होणार असून शहराबरोबर भिवंडी ग्रामीण भागातही त्यांच्या बैठकींचे आयोजन करण्यात आले आहेत. याठिकाणी पक्षप्रवेशही होणार आहेत. तेथून ते थेट दुपारी शहापुरला रवाना, शहापुरवरुन मुरबाड, अंबरनाथ असा दौरा असणार आहे. रविवारी सकाळी बदलापुर, पुन्हा अंबरनाथमध्ये मॅरेथॉन बैठका तेथून उल्हासनगर, कल्याण येथे आल्यावर पूर्व आणि पश्चिम विधानसभा मतदार संघासाठी चर्चा केली जाणार आहे. अखेरच्या दिवशी म्हणजेच सोमवारी डोंबिवली, कल्याण ग्रामीण, नवीमुंबई, बेलापुर, त्यानंतर ठाण्यात मुक्कामी येणार आहेत. याठिकाणी तीन विधानसभा मतदारसंघाचा आढावा घेणार आहेत.