Raj Thackeray : ९ एप्रिलला पुन्हा राज गर्जना! सभा स्थळावरून वाद; पोलीस परवानगी देईना; मात्र मनसे ठाम
By ऑनलाइन लोकमत | Published: April 6, 2022 05:43 PM2022-04-06T17:43:06+5:302022-04-06T17:43:44+5:30
"महाराष्ट्रात ज्यांनी ज्यांनी टीका केली आहे, त्या सर्वाना उत्तर दिले जाणार"; मनसे आक्रमक
ठाणे : गुढीपाडव्याच्या दिवशी मनसे प्रमुख राज ठाकरे यांनी मशिदीवरील भोंगे आणि मदरशा संदर्भात केलेल्या वक्तव्यावर गृहनिर्माणमंत्री जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर टीका केली होती. त्यानंतर आता येत्या ९ एप्रिल रोजी ठाण्यात मनसेच्या माध्यमातून राज ठाकरे यांची सभा आयोजित करण्यात आली आहे. यादिवशी उत्तर सभा घेतली जाईल असा इशारा देखील मनसेने दिला आहे. असे असेल तरी देखील मनसेने ज्या मुस रोडवर सभेसाठी परवानगी मागितली आहे त्याऐवजी इतर ठिकाणांचा पर्याय पोलिसांनी त्यांच्यापुढे ठेवला आहे. मात्र त्याच ठिकाणी सभा घेण्यासाठी मनसे ठाम असल्याने सभेचे काय होणार हे पाहणे देखील आता तितकेच महत्वाचे ठरले आहे.
गडकरी रंगायतन नाट्यगृहाजवळील मुस चौकात महाराष्ट्र नविनर्माण सेनेचे अध्यक्ष राज ठाकरे यांची सभा जाहीर घेण्यासाठी मनसेच्या स्थानिक नेत्यांनी पोलिसांना अर्ज दिला आहे. दरम्यान याच दिवशी हिंदीभाषा एकता परिषद आणि राजस्थानी सेवा समिती यांच्या संयुक्त विद्यमाने सायंकाळी ७.३० वाजता गडकरी रंगायतनमध्ये २८ व्या राष्ट्रीय कवी संमेलनाचे आयोजन करण्यात आले आहे. या कार्यक्रमाला पालकमंत्री एकनाथ शिंदे, गृह निर्माण विभागाचे पोलिस महासंचालक विवेक फणसाळकर यांच्यासह आमदार आणि खासदार उपस्थित राहणार आहेत. त्यामुळे पोलिसांना येथे बंदोबस्त तैनात ठेवावा लागणार आहे. शिवाय, सभेमुळे परिसरातील रस्त्यांवर वाहतूक कोंडी होण्याची शक्यता व्यक्त होत आहे. यामुळे पोलिसांनी सभेसाठी मुस चौकाऐवजी शहरातील हायलॅन्ड मैदान व काशिनाथ घाणोकर नाटय़गृह हे दोन पर्याय सुचविले आहेत.
अद्याप परवानगी नाही
मनसेचे अध्यक्ष राज ठाकरे यांनी गुढी पाडव्याच्या जाहीर सभेत हिंदुत्वाचा पुरस्कार करत मशिदीवरील भोंगे आणि मदरशांबाबत विधान केल्यानंतर गृहनिर्माण मंत्नी जितेंद्र आव्हाड यांनी त्यांच्यावर टिका केली होती. या पार्श्वभूमीवर राज यांच्या ९ एप्रिलच्या नियोजित सभेच्या आयोजनाकडे राजकीय वर्तुळात वेगवेगळे अर्थ काढले जात आहेत. शिवसेनेचा बालेकिल्ला असलेल्या या भागात राज यांच्या सभेला अजूनही परवानगी मिळालेली नाही. गडकरी रंगायतन नाट्यगृहाजवळील मुस चौकात राज ठाकरे यांची सभा जाहीर घेण्यासाठी मनसेच्या स्थानिक नेत्यांनी पोलिसांना अर्ज दिला आहे. पोलिसांनी सभेला अद्याप परवानगी दिलेली नाही.
मात्र मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांनी मात्र त्याचिठकाणी सभा होणार असल्याचे स्पष्ट केले आहे. पोलिसांनी परवानगी दिली नाही तरी आम्ही त्याच ठिकाणी सभा घेऊ असे त्यांनी म्हटले आहे. तसेच महाराष्ट्रात ज्यांनी ज्यांनी टीका केली आहे, त्या सर्वाना उत्तर दिले जाणार असून या दिवशी उत्तर सभा म्हणजे उत्तरे दिली जाणार असेही त्यांनी स्पष्ट केले.