ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या मोटारीवर मनसैनिकांनी फेकले शेण, बांगड्या; गडकरी रंगायतनबाहेर राडा

By ऑनलाइन लोकमत | Published: August 11, 2024 05:37 AM2024-08-11T05:37:45+5:302024-08-11T05:38:09+5:30

राज यांच्यावर सुपाऱ्या फेकल्याचा वचपा काढण्याकरिता आंदोलन

Raj Thackeray supporters attack Uddhav Thackeray car at Thane Maharashtra Politics | ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या मोटारीवर मनसैनिकांनी फेकले शेण, बांगड्या; गडकरी रंगायतनबाहेर राडा

ठाण्यात उद्धव ठाकरे यांच्या मोटारीवर मनसैनिकांनी फेकले शेण, बांगड्या; गडकरी रंगायतनबाहेर राडा

लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : बीडमध्ये उद्धवसेनेच्या पदाधिकाऱ्यांनी मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या गाडीवर सुपाऱ्या फेकल्याचे पडसाद शनिवारी ठाण्यात उमटले. उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे ठाण्यातील सभेसाठी येत असताना मुलुंड चेक नाक्याजवळ ठाकरे यांच्या गाडीवर मनसैनिकांनी शेण फेकले. गडकरी रंगायतन येथे जमलेल्या आक्रमक मनसैनिकांनी ठाकरे यांच्या गाडीवर बांगड्याही फेकल्या. त्यामुळे रंगायतन परिसरात मनसैनिक आणि शिवसैनिक आमने-सामने आले. यावेळी त्यांनी परस्परांना शिवीगाळ व धक्काबुक्की केली. दोन्हीकडील कार्यकर्त्यांना रोखताना पोलिसांची तारांबळ उडाली. पोलिसांनी मनसैनिकांना ताब्यात घेतल्याने पुढील राडा टळला.

उद्धवसेनेतर्फे शनिवारी गडकरी रंगायतन येथे ‘भगवा सप्ताह’ आयोजित केला होता. यावेळी उद्धव ठाकरे मार्गदर्शन करणार असल्याने येथे कार्यकर्त्यांची गर्दी होती. मनसैनिक रंगायतनसमोरील पदपथ व आजूबाजूच्या गल्ल्यात दबा धरून होते. बीड येथे उद्धवसेनेच्या कार्यकर्त्यांनी राज ठाकरे यांच्यावर सुपाऱ्या फेकत ‘सुपारीबाज’ अशी टीका केली होती. त्याचा वचपा काढण्याची तयारी मनसेने केली होती. 

दरम्यान, राड्याप्रकरणी मनसेचे ठाणे जिल्हाध्यक्ष अविनाश जाधव यांच्यासह मनसेच्या ३५ जणाविरुद्ध गुन्हा दाखल केल्याची माहिती नौपाडा पोलिसांनी दिली.

  • असा झाला राडा...
  1. उद्धव ठाकरे यांच्या मोटारींच्या ताफ्याने ठाण्यात प्रवेश करताच मनसेच्या काही कार्यकर्त्यांनी ठाकरे यांच्या गाडीवर शेण आणि बांगड्या फेकल्या. त्यानंतर त्यांची गाडी गडकरी रंगायतन येथे येताच मनसेच्या कार्यकर्त्यांनी गडकरी रंगायतनच्या आवारात प्रवेश केला आणि घोषणाबाजी केली. 
  2. मोटारीवर बांगड्या फेकल्या. काहींनी हातातील लोखंडी कडे फेकले. गाडीवर नारळही फेकण्याचा प्रयत्न झाला. सुदैवाने त्यामुळे कुणाला इजा झाली नाही. उद्धव यांच्या स्वागताकरिता लावलेले बॅनर व पोस्टर मनसैनिकांनी फाडले. सभेकरिता आलेल्या वाहनांच्या मनसैनिकांनी काचा फोडल्या. ठाकरेंच्या सभेकरिता जमलेले शिवसैनिक बाहेरील घटना कळताच रंगायतनच्या बाहेर आले. 
  3. मनसैनिक व शिवसैनिक यांच्यात बाचाबाची, शिवीगाळ सुरू झाली.  मात्र, सुरक्षेकरिता असलेल्या पोलिसांनी हातात मनसेचे झेंडे घेतलेल्या व घोषणाबाजी करणाऱ्यांना झटपट पकडून पोलिसांच्या गाड्यांत कोंबल्याने आणखी टोकाचा राडा टळला. त्यानंतर पोलिस बंदोबस्तामध्ये ठाकरे सभास्थळी दाखल झाले.
     
  • १५०० रुपयांची लाच घेऊन महाराष्ट्र विकायला देणार का? ठाण्यातील सभेत उद्धव ठाकरे यांचा सवाल

लाडकी बहीण योजनेच्या माध्यमातून १५०० रुपयांची लाच देऊन तुम्हाला विकत घेण्याचा प्रयत्न मिंधे सरकारकडून केला जात आहे. केवळ १५०० रुपयांसाठी तुम्ही महाराष्ट्र विकायला देणार आहात का, असा सवाल उद्धवसेनेचे प्रमुख उद्धव ठाकरे यांनी शनिवारी केला. महिलांनी आता ठरवले पाहिजे की आम्हाला लाच नको तर रोजगार द्या, असेही ते म्हणाले. ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे उद्धवसेनेच्या वतीने ‘भगवा सप्ताहा’च्या निमित्ताने आयोजित कार्यक्रमात ठाकरे बोलत होते.

  • ‘मातोश्री’ बाहेर घोषणाबाजी

वक्फ बोर्ड संशोधन बिलाच्या मुद्द्यावरून शनिवारी काही लोकांचा जमाव उद्धव ठाकरे यांच्या वांद्रे येथील ‘मातोश्री’ निवासस्थानासमोर आला व तेथे घोषणाबाजी करू लागला. त्यावेळी वांद्रे परिसरातील ठाकरे गटाचे कार्यकर्तेही तिथे जमा झाले. दोन्ही बाजूंनी घोषणाबाजी सुरू होती. त्यामुळे काही काळ तणावाचे वातावरण निर्माण झाले. जमावाला पांगविण्यासाठी पोलिसांचा मोठा फौजफाटा मागविण्यात आला. या घोषणाबाजीवेळी उद्धव ठाकरे निवासस्थानीच होते. त्यानंतर ते ठाण्यातील सभेसाठी रवाना झाले.

  • गडकरी परिसरात चोख पोलिस बंदोबस्त

उद्धव यांच्या सभेच्या वेळी राडा होणार अशी कुणकुण लागल्यामुळे गडकरी परिसरात आणि सभागृहात पोलिस बंदोबस्त ठेवण्यात आला होता. प्रत्येकाची तपासणी करून त्याला सभेच्या ठिकाणी सोडले जात होते. मराठवाड्यात राज ठाकरे यांच्या सभेकरिताही अशीच खबरदारी पोलिसांनी घेतली होती. राडा करणा-या मनसैनिकांना पोलिसांनी ताब्यात घेतले असून त्यांच्यावर पुढील कारवाई रात्री उशिरापर्यंत सुरू होती. 

आमचे पक्षाध्यक्ष राज ठाकरे यांच्या मोटारीसमोर शुक्रवारी उद्धवसेनेच्या कार्यकर्त्यांनी सुपाऱ्या फेकल्या. त्यामुळे मनसैनिकांमध्ये खदखद होती. आमच्या १५० ते २०० मनसैनिकांनी आंदोलन करून उद्धवसेनेला चोख प्रत्युत्तर दिले. मनसे जशास तसे उत्तर द्यायला मागेपुढे पाहणार नाही.
- अविनाश जाधव, जिल्हाध्यक्ष, मनसे, ठाणे-पालघर

Web Title: Raj Thackeray supporters attack Uddhav Thackeray car at Thane Maharashtra Politics

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.