राज ठाकरे आज ठाण्यात; राज्यव्यापी दौऱ्यापूर्वी कार्यकर्त्यांना मार्गदर्शन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: April 19, 2018 01:59 AM2018-04-19T01:59:15+5:302018-04-19T04:39:42+5:30
शहराध्यक्षांच्या निवडीची घोषणा?
ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांचा महाराष्ट्र दौरा १ मे पासून सुरू होत आहे. तत्पूर्वी उद्या (गुरुवार) १९ एप्रिलला सकाळी ८ ते दुपारी १२ या वेळेत ठाण्यात मनसे पदाधिकाऱ्यांची कार्यशाळा होत असून त्याला राज ठाकरे मार्गदर्शन करणार आहेत, अशी माहिती ठाणे जिल्हा अध्यक्ष अविनाश जाधव यांनी दिली.
काही महिन्यांपूर्वी राज यांनी ठाण्यात मनसे गट अध्यक्षांचा मेळावा आयोजित केला होता. यात त्यांच्याकडून तक्रारी आणि सूचना मागवण्यात आल्या होत्या. त्यानंतर, गडकरी रंगायतनसमोर त्यांची जाहीर सभा झाली. आता ते थेट पक्षातील पुरुष पदाधिकारी आणि सर्व शाखाध्यक्षांची कार्यशाळा घेऊन त्यांना मार्गदर्शन करणार आहेत. महाराष्ट्रात अशा प्रकारे प्रथमच कार्यशाळा होत असून पहिली कार्यशाळा ठाण्यात होणार आहे. त्यानंतर विविध शहरांत कार्यशाळा होतील, असे जाधव यांनी सांगितले. शहरात २२६ पदाधिकारी आहेत. या पदाधिकाºयांना लोकोपयोगी कामे कशी करावीत, जनसंपर्क कसा वाढवावा आदी अनेक मुद्यांवर राज मार्गदर्शन करणार आहेत. राज हे प्रेझेंटेशनच्या माध्यमातून संवाद साधणार आहेत.
रस्सीखेच संपणार?
गडकरी रंगायतनसमोर झालेल्या जाहीर सभेत राज यांनी अविनाश जाधव यांची ठाणे जिल्हाध्यक्षपदी निवड केल्यानंतर ठाणे शहराध्यक्षपदी कोण विराजमान होणार, याची चर्चा गेल्या अनेक दिवसांपासून मनसेवर्तुळात रंगली आहे. ठाणे शहराध्यक्षपदाच्या शर्यतीत अनेक जण असून ठाण्यातील वरिष्ठ नेत्यांचे निष्ठावंत पदाधिकारी प्रयत्नशील आहेत. गुरुवारी ठाण्यातील पदाधिकाºयांच्या कार्यशाळेत राज हे शहराध्यक्षांची निवड जाहीर करतील, अशी चर्चा आहे.