राज ठाकरेंच्या सभेला परवानगी मिळेना! ठाणे शहराध्यक्ष अविनाश जाधव यांना अमराठी पोलीस अधिका-याकडून कोठडीत बेदम मारहाण
By ऑनलाइन लोकमत | Published: November 13, 2017 12:38 PM2017-11-13T12:38:34+5:302017-11-13T12:44:40+5:30
फेरीवाल्यांच्या प्रश्नावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतलेल्या आक्रमक भूमिकेच्या पार्श्वभूमीवर येत्या 18 नोव्हेंबरला ठाण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे
मुंबई - फेरीवाल्यांच्या प्रश्नावर महाराष्ट्र नवनिर्माण सेनेने घेतलेल्या आक्रमक भूमिकेच्या पार्श्वभूमीवर येत्या 18 नोव्हेंबरला ठाण्यात मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांची जाहीर सभा आयोजित करण्यात आली आहे. मात्र या सभेच्या जागेवरुन वाद सुरु आहे. मनसेला ठाणे पश्चिमेला रेल्वे स्थानकाजवळील अशोक टॉकीज किंवा तलावपाळी मार्गावर सभा आयोजित करायची आहे. मात्र रस्त्यावरील सभेला परवानगी देणार नाही अशी भूमिका ठाणे पोलिसांनी घेतली आहे.
ठाणे रेल्वे स्थानक परिसरात शासकीय कार्यालये आहेत. मनसेला ज्या ठिकाणी सभा घ्यायची आहे तो वर्दळीचा रस्ता आहे. या ठिकाणी सभेला परवानगी दिल्यास वाहतूक कोंडी निर्माण होईल म्हणून पोलिसांनी इथे सभेला परवानगी नाकारली आहे. एलफिन्स्टन पूल दुर्घटनेनंतर चर्चगेट स्थानकाजवळ सभा आयोजित करायला राज यांना पोलिसांनी परवानगी नाकारली होती. तरीही मनसेने इथे सभा आणि मोर्चा आयोजित केला होता. त्याचवेळी राज यांनी फेरीवाल्यांना 15 दिवसांची मुदत दिली होती. त्यानंतर मुंबई, ठाणे परिसरात मनसेने फेरीवाल्यांना हुस्कावून लावायला सुरुवात केली.
स्टेशन परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधातील आंदोलन करणारे मनसे ठाणे शहराध्यक्ष अविनाश जाधव व त्यांच्या सहका-यांना ठाण्यातील एका वरिष्ठ अमराठी पोलीस अधिका-याने कोठडीत मारहाण केल्याने पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे हे कमालीचे संतापले आहेत.
२१ ऑक्टोबर रोजी फेरीवाल्यांविरोधात आंदोलन केल्यानंतर सोमवार, २३ ऑक्टोबर रोजी अविनाश जाधव यांना व त्यांच्या सहका-यांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस कोठडीत एका अमराठी पोलीस अधिका-याने जाधव यांना मारहाण केली. न्यायालयाने जेमतेम १५ हजार रुपयांच्या जामिनावर जाधव यांची सुटका केली.
त्यानंतर, फेरीवाल्यांविरुद्ध आक्रमक आंदोलन करण्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता असल्याने आगामी तीन वर्षांच्या कालावधीसाठी चांगल्या वर्तणुकीच्या हमीकरिता जाधव यांच्याकडे प्रारंभी एक कोटींच्या जामीनदाराची मागणी करणारी नोटीस पोलिसांनी त्यांना बजावली होती.