राज करणार मुख्यमंत्र्यांना लक्ष्य? अविनाश जाधव यांना पोलिसांनी मारहाण केल्याने असंतोष
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 12, 2017 04:42 AM2017-11-12T04:42:47+5:302017-11-12T04:42:57+5:30
स्टेशन परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधातील आंदोलन करणारे मनसे ठाणे शहराध्यक्ष अविनाश जाधव व त्यांच्या सहका-यांना ठाण्यातील एका वरिष्ठ अमराठी पोलीस अधिका-याने कोठडीत मारहाण केल्याने पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे हे कमालीचे संतापले असून त्यांनी पुढील शनिवार, १८ नोव्हेंबर रोजी जाहीर सभा घेण्याचे जाहीर केले आहे.
ठाणे : स्टेशन परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांविरोधातील आंदोलन करणारे मनसे ठाणे शहराध्यक्ष अविनाश जाधव व त्यांच्या सहका-यांना ठाण्यातील एका वरिष्ठ अमराठी पोलीस अधिका-याने कोठडीत मारहाण केल्याने पक्षाचे अध्यक्ष राज ठाकरे हे कमालीचे संतापले असून त्यांनी पुढील शनिवार, १८ नोव्हेंबर रोजी जाहीर सभा घेण्याचे जाहीर केले आहे. या सभेत राज हे ठाणे पोलिसांना आणि पर्यायाने गृहखाते सांभाळणाºया मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांना लक्ष्य करण्याचे संकेत प्राप्त होत आहेत.
एल्फिन्स्टन रेल्वे पुलावरील दुर्घटनेनंतर स्टेशन परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांना १५ दिवसांत हटवण्याची मुदत राज ठाकरे यांनी रेल्वे व पोलीस प्रशासनाला दिली होती. १५ दिवसांत फेरीवाले हटले नाही, तर त्यानंतर मनसैनिक या फेरीवाल्यांना हटवतील, असा इशाराही त्यांनी दिला होता. त्यांच्या सूचनेनुसार मनसेच्या कार्यकर्त्यांनी स्टेशन परिसरातील अनधिकृत फेरीवाल्यांना मारहाण करून पिटाळून लावले. २१ आॅक्टोबर रोजी फेरीवाल्यांविरोधात आंदोलन केल्याने सोमवार, २३ आॅक्टोबर रोजी त्यांना व त्यांच्या सहकाºयांना पोलिसांनी ताब्यात घेतले. पोलीस कोठडीत एका अमराठी पोलीस अधिकाºयाने जाधव यांना मारहाण केली. न्यायालयाने जेमतेम १५ हजार रुपयांच्या जामिनावर जाधव यांची सुटका केली. त्यानंतर, फेरीवाल्यांविरुद्ध आक्रमक आंदोलन करण्याची पुनरावृत्ती होण्याची शक्यता असल्याने आगामी तीन वर्षांच्या कालावधीसाठी चांगल्या वर्तणुकीच्या हमीकरिता जाधव यांच्याकडे प्रारंभी एक कोटींच्या जामीनदाराची मागणी करणारी नोटीस पोलिसांनी त्यांना बजावली होती. याबाबत, मनसेतून नाराजीचा सूर उमटला. तसेच मनसे नेते बाळा नांदगावकर यांनी ठाणे पोलीस आयुक्त परमवीर सिंग यांची भेट घेतली. त्यानंतर, पाच लाखांचा जामीनदार देण्याचा फतवा पोलिसांनी काढला. न्यायालयाने काही हजार रुपयांच्या जामिनावर जाधव यांची मुक्तता केली असताना पोलिसांनी लाखो, कोटी रुपयांच्या जामीनदाराचा आग्रह धरणे, हा मनसैनिकांना हेतुत: त्रास देण्याचा प्रयत्न असल्याचा आरोप पक्षाने केला आहे. पुण्यात तर पोलिसांनी मनसैनिकांवर दरोड्याचा गुन्हा दाखल केला. याआधीही टोलनाक्यावरील आंदोलनावेळी जाधव यांना पोलिसांनी दंडुक्याचा प्रसाद दिला होता.
गंभीर कलमांखाली दाखल गुन्हे आणि मोठ्या रकमेच्या जामीनदाराची सक्ती यामुळे राज ठाकरे आपल्या सभेत पोलिसांचा खरपूस समाचार घेणार आहेत. गुरुवारी मनसे पदाधिकाºयांनी राज यांची भेट घेऊन त्यांच्याशी चर्चा केली. या बैठकीत त्यांना महापालिकेतील ठेकेदारी-टक्केवारीच्या राजकारणाची इत्थंभूत माहिती दिल्याचे पदाधिकाºयांनी सांगितले. लागलीच राज यांनी १८ नोव्हेंबरच्या जाहीर सभेची घोषणा केली. त्यामुळे महापालिका प्रशासनावरही राज टीकास्त्र सोडतील, असे संकेत मिळत आहेत. राज यांनी नुकतीच समृद्धी महामार्गबाधित शेतक-यांची भेट घेतली. या वेळी शेतकºयांनी आपली व्यथा त्यांच्यासमोर मांडली. याबाबतही ते या सभेत आपली भूमिका स्पष्ट करणार आहेत.
मुख्यमंत्री कोणता निर्णय घेतात?
गृह व नगरविकास ही दोन्ही खाती मुख्यमंत्र्यांकडे असल्याने राज हे मुख्यमंत्री फडणवीस यांनाच लक्ष्य करण्याची शक्यता आहे.ठाणे महापालिकेतील ठेकेदारी-टक्केवारीसंदर्भात सत्ताधा-यांविरोधात एका माजी महापौरांनी मुख्यमंत्र्यांकडे तक्रार केली होती व न्यायालयातही जाण्याचा इशारा दिला होता. त्याउपरही काही हालचाली झालेल्या नसल्याने राज यांच्या सभेपूर्वी मुख्यमंत्री काही घोषणा करतात किंवा कसे, याचीही उत्सुकता आहे.