छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याच्या चौथऱ्यामागे राजमुद्रा, अंंबरानाथमधील शिवप्रेमींनी घेतला आक्षेप
By ऑनलाइन लोकमत | Published: March 15, 2020 12:09 AM2020-03-15T00:09:40+5:302020-03-15T00:10:14+5:30
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या चौथऱ्यावर राजमुद्राचे शिल्प हे मागच्या बाजूला बसवण्यात आले आहे, त्यामुळे ही राजमुद्रा दृष्टिक्षेपात येत नाही.
अंबरनाथ : अंबरनाथ नगरपरिषदेच्या वतीने नुकतेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याभोवती मेघडंबरीचे काम करण्यात आले. त्याचा लोकार्पण सोहळाही दिमाखात साजरा करण्यात आला. मात्र, महाराजांच्या पुतळ्याच्या चौथऱ्यावर लोकार्पणाचे जे फलक लावले आहेत ते फलक काढून त्या ठिकाणी राजमुद्रा लावण्याची मागणी करण्यात येत आहे. या चौथऱ्यावर राजमुद्रा ही मागच्या बाजूला लावल्याने काही शिवप्रेमींनी त्यावर आक्षेप घेत ही मुद्रा दर्शनी भागात लावण्याची मागणी केली आहे.
छत्रपती शिवाजी महाराज यांच्या पुतळ्याच्या चौथऱ्यावर राजमुद्राचे शिल्प हे मागच्या बाजूला बसवण्यात आले आहे, त्यामुळे ही राजमुद्रा दृष्टिक्षेपात येत नाही. त्याउलट लोकार्पणाचे फलक हे दर्शनी भागात लावले आहेत. या फलकावर राजकीय नावे असून ते फलक मागच्या बाजूला बसवण्याची मागणी केली जात आहे. राजमुद्रेचा आदर करून ती राजमुद्रा महाराजांच्या पुतळ्याखालील चौथऱ्यावर दर्शनी भागातच लावण्यात यावी, अशी मागणी छत्रपती शासन प्रतिष्ठान या सामाजिक संस्था आणि मनसेतर्फे करण्यात आली आहे. लोकार्पण याच कोनशिलेवर कोणाची नावे आहेत, हा वादाचा मुद्दा नसून राजमुद्रा दर्शनी भागात लावावी, एवढी माफक अपेक्षा व्यक्त करण्यात येत आहे.
दर्शनीभागात पुढाऱ्यांची नावे
अंबरनाथच्या छत्रपती शिवाजी महाराज चौकात लावलेल्या कोनशिलेवर अनेक पुढाऱ्याची नावे आहेत. त्यात सर्वात खाली उपनगराध्यक्ष अब्दुल शेख यांचेही नाव कोरण्यात आले आहे. शेख यांचे नाव काही व्यक्तींनी काळा रंग लावून बुजवण्याचा प्रयत्न केला आहे, त्यामुळे राजकारण तापले आहे.
शेख यांनी या लोकार्पण सोहळ्यात खासगी बांधकाम व्यावसायिकाचे नाव कोनशिलेवर लावण्यात विरोध दर्शवला होता. त्यावरून मोठा वादही निर्माण झाला होता. त्यातच आता शेख यांच्या नावावर काळा रंग लावल्याने तो पुन्हा चर्चेचा विषय ठरला आहे.