क्लस्टरसाठी राजन विचारेंचे पंतप्रधानांना साकडे
By admin | Published: August 5, 2015 12:34 AM2015-08-05T00:34:24+5:302015-08-05T00:34:24+5:30
नौपाडा बी कॅबीन परिसरामध्ये कृष्णा निवास ही तीन मजली इमारत सोमवारी रात्री १.५५ च्या सुमारास कोसळली. त्यामध्ये १२ जणांना प्राण गमवावा लागला
ठाणे : नौपाडा बी कॅबीन परिसरामध्ये कृष्णा निवास ही तीन मजली इमारत सोमवारी रात्री १.५५ च्या सुमारास कोसळली. त्यामध्ये १२ जणांना प्राण गमवावा लागला तर ७ जण गंभीर जखमी झाले. या पार्श्वभूमीवर खासदार राजन विचारे यांनी संसदेच्या पावसाळी अधिवेशनात पंतप्रधान नरेंद्र मोदी यांची भेट घेऊन ठाणेसह नवी मुंबई तसेच मीरा भार्इंदर शहरात मोठ्या प्रमाणावर असलेल्या धोकादायक इमारतीच्या पुनर्विकासासाठी तातडीने क्लस्टर डेव्हलपमेंटची अंमलबजावणी करण्याची मागणी केली.
ठाणे महानगरपालिका हद्दीत आजघडीला २६३९ धोकादायक इमारती असून त्यापैकी ५८ इमारती अतिधोकादायक आहेत. मीरा भार्इंदर शहरात २५ तर नवी मुंबईमध्ये ९२ इमारती अतिधोकादायक असून त्या कधीही कोसळून मोठ्या प्रमाणावर जीवित आणि वित्त हानी होण्याची शक्यता आहे. राज्य सरकारने शहरामधील धोकादायक इमारतींच्या पुनर्वसनासाठी क्लस्टर डेव्हलपमेंट योजना लागू केली. परंतु, अद्यापही तिची अंमलबजावणी न झाल्याने अनेक इमारतींचा प्रश्न ऐरणीवर आला आहे. ठाणे महापालिका हद्दीत गेल्या काही वर्षामध्ये साईराज, मनोज भवन, सोनुबाई भवन, लक्ष्मी सदन, लकी कंपाऊंड, मुंब्रा येथील बानू, स्मृती सोसायटी, श्रीकृष्णा इमारत आणि दोन दिवसापूर्वी ठाकुर्ली येथील मातृकृपा इमारत कोसळण्याच्याघटना घडल्या आहेत. या शहरांमध्ये धोकादायक इमारत कोसळण्याच्या घटना वारंवार घडत असून मोठया प्रमाणावर जीवित हानी होत आहे. या संदर्भात खा. विचारे यांनी केंद्र शासनाचे लक्ष वेधले.