जिल्हा मध्यवर्ती बँकेच्या अध्यक्षपदी राजन पाटील
By admin | Published: April 19, 2017 12:29 AM2017-04-19T00:29:13+5:302017-04-19T00:29:13+5:30
ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी बहुजन विकास आघाडीचे राजन पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे
ठाणे : ठाणे जिल्हा मध्यवर्ती सहकारी बँकेच्या अध्यक्षपदी बहुजन विकास आघाडीचे राजन पाटील यांची बिनविरोध निवड झाली आहे. मंगळवारी झालेल्या अध्यक्षपदाच्या निवडणुकीच्या वेळी त्यांचा एकमेव अर्ज आल्याने ही बिनविरोध निवड झाल्याचे निवडणूक निर्णय अधिकारी जिल्हा उपनिबंधक दिलीप उढाण यांनी जाहीर केले.
तब्बल सात हजार कोटींची वार्षिक उलाढाल असलेल्या या जिल्हा बँकेवर ५९ वर्षांच्या इतिहासात प्रथमच हितेंद्र ठाकूर यांच्या बहुजन विकास आघाडीचे संचालक पाटील यांची अध्यक्षपदी निवड झाली आहे. आमदार हितेंद्र ठाकूर, भिवंडीचे खासदार कपिल पाटील, आमदार किसन कथोरे, सर्व संचालक, बँकेचे मुख्य कार्यकारी अधिकारी भगीरथ भोईर यांच्यासह बँकेच्या अधिकारी आणि कर्मचाऱ्यांनी नवनिर्वाचित अध्यक्षांचे यावेळी अभिनंदन केले.
बाबाजी पाटील यांनी राजीनामा दिल्यानंतर ठाकूर यांच्या नेतृत्वाखालील बहुजन विकास आघाडी आणि भाजपने एकत्र येऊन उपाध्यक्षा सुनिता दिनकर यांच्याकडे प्रभारी अध्यक्षपदाची सूत्रे सोपविली होती. अध्यक्षपद रिक्त असल्याने या पदासाठी १८ एप्रिल रोजी निवडणूक जाहीर झाली होती. त्यानुसार मंगळवारी सकाळी ११.३० वा. पर्यंत बहुजन विकास आघाडीचे राजन पाटील यांचा एकमेव अर्ज आला. ११.३५ पर्यंत त्याची छानणी होऊन तो वैध झाला.
अन्य कोणाचाही अर्ज न आल्याने १९ संचालकांच्या मान्यतेने त्यांचीच अध्यक्षपदी बिनविरोध निवड झाल्याचे उढाण यांनी जाहीर केले. राजीनामा चर्चेच्या वेळी अनुपस्थित असलेले मावळते अध्यक्ष बाबाजी पाटील आणि सुभाष पवार हेही यावेळी उपस्थित होते. प्रभारी अध्यक्षपदाची सूत्रे सांभाळणाऱ्या सुनिता दिनकर यांच्याकडे पुन्हा उपाध्यक्षपदाची सूत्रे आली आहेत. बदललेल्या राजकीय समीकरणांच्या पार्श्वभूमीवर बहुजन आघाडीला यानिमित्ताने ग्रामीण अर्थकारणावर आपली पकड निर्माण करता येणार आहे.