हुकूमशाहीच्या अहंकाराविरुद्ध शिवशाहीची क्रांतीची मशाल धगधगणार!
By अजित मांडके | Published: February 19, 2024 08:10 PM2024-02-19T20:10:15+5:302024-02-19T20:11:10+5:30
शिवजयंतीला राजन विचारांचे महाराजांना पत्र
अजित मांडके, लोकमत न्यूज नेटवर्क, ठाणे : शिवजयंतीच्या दिवशी शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे गटाचे खासदार राजन विचारे यांनी थेट छत्रपती शिवाजी महाराजांना पत्र लिहिलं आहे. त्या पत्रात विचारेंनी महाराष्ट्राची सद्यस्थितीचे उल्लेख करताना, शिवसेना प्रमुख दिवंगत बाळासाहेब ठाकरे यांनी स्थापन केलेल्या शिवसेना नावाच्या स्वराज्य आणि पक्ष चिन्ह असलेले ' धनुष्यबाण ' स्वतःच्या स्वार्थासाठी कसे तोडले याबद्दल नमूद केले आहे. तसेच आता हुकूमशाहीच्या अहंकारविरुद्ध शिवशाहीची क्रांतीची मशाल धगधगणार असे म्हटले आहे. हुकूमशाही विरुद्ध लढाईत शिवशाही विजयी होणार, तो विजय आमच्याकडून तुम्हाला मानाचा मुजरा असणार आहे. या व्हायरल झालेल्या त्या पत्राच्या साडेपाच मिनिटांच्या व्हिडिओने पुन्हा विचारेंनी भावनिक आणि मार्मिक मुद्दे मांडून योग्य पध्द्तीने भाजप- शिंदे सरकारवर निशाणा साधला आहे.
या व्हिडीओच्या सुरवातीला त्यांनी महाराजानां मुजरा करत, महाराज तुमची आठवण येते असे म्हटले आहे. शिवजयंती म्हणजे शिव भक्तांसाठी दिवाळी आहे. तसेच महाराज आपण रायलेश्वरासमोर स्वराज्याची शपथ घेतली होती. तशीच शपथ आपल्या पुतळ्यासमोर बाळासाहेबांनी घेत, शिवसेना नावाचे स्वराज घेऊन आमच्या रक्षणासाठी उभे राहिले. मात्र त्यांच्या ५८ वर्षांचे धनुष्यबाण काही मंडळींनी स्वतःच्या शुल्लक स्वार्थासाठी तोडू टाकल्याची खंत व्यक्त केली. महाराज आपण म्हटले होते राजा कोणी ही असो पण रयत महत्वाची आहे. पण आज धर्म आणि जातीच्या नावावर त्या रयतेच्या मनात एकमेकांविषयी विष पसरवले जात आहे. पण ज्यांना हे कळते ते तुमच्या नावाने हिंदुत्वाचा गैरवापर करत आहेत. चाकू, सुऱ्या,कोयते आणि बंदूक घेऊन गुंड रस्त्यावर फिरताना दिसत आहे. आता सत्याच्या बाजूने उभे राहणाऱ्या पत्रकारांवर हल्ले होतात, विद्यार्थ्यांना मारहाण केली जाते, ही सत्ता रयतेच्या मनात दहशत निर्माण करीत आहे. असे म्हटले आहे. ज्या स्वराज्यात बळीराजाला आपण मानाचे स्थान दिले होते, त्यालाच आज स्वतःच्या हक्कासाठी सरकार विरुद्ध लढावे लागत आहे. महाराज तुमचाच गनिमी कावा यांनी स्वराज्य फोडण्यासाठी केला.
आता शब्दांनाही लाज वाटावी, एवढे यांचे चारित्र्य मल्लीन झाले आहे. यांना माफी नाही महाराज, हे राज्य उलटून टाकण्याची वेळ आली आहे. आणि आज मी एकटा नाही महाराज, बाळासाहेबांचे विचार घेऊन उद्धव ठाकरे त्यांचे सुपुत्र आदित्य ठाकरे यांच्या सोबतीने आम्ही सर्व मावळे उतरलोय, आम्ही लढणार. सत्ता नाही इनाम महत्त्वाचा आहे,असे आपणच म्हटले होते. या हुकूमशाही विरुद्ध शिवशाहीची ही लढाई सच्चाई ची लढाई आहे. सत्याचा विजय होणार, रयतेच्या मनात जी ज्योत पेटवली आहे, ती आता वनवा होणार, क्रांतीची मशाल धगधगणार, हुकूमशाही विरुद्ध लढाईत शिवशाही विजयी होणार , तो विजय आमच्याकडून तुम्हाला मानाचा मुजरा असणार आहे. असेही विचारेंनी त्या पत्रात म्हटले.