राजन विचारेंना धक्का; माजी आमदार गिल्बर्ट मेंडोंसा यांचा नरेश म्हस्केंना पाठिंबा 

By धीरज परब | Published: May 17, 2024 02:03 PM2024-05-17T14:03:41+5:302024-05-17T14:04:15+5:30

मीरा भाईंदरचे पहिले नगराध्यक्ष आणि पहिले आमदार राहिलेले गिल्बर्ट मेंडोन्सा यांची एकेकाळी शहरात एकहाती सत्ता होती

Rajan vichare shocked; Former MLA Gilbert Mendonsa supports Naresh Mhaske | राजन विचारेंना धक्का; माजी आमदार गिल्बर्ट मेंडोंसा यांचा नरेश म्हस्केंना पाठिंबा 

राजन विचारेंना धक्का; माजी आमदार गिल्बर्ट मेंडोंसा यांचा नरेश म्हस्केंना पाठिंबा 

मीरारोड - मीरा भाईंदरचे माजी आमदार गिल्बर्ट मेंडोन्सा यांची मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्या सोबत भेटीनंतर मेंडोन्सा यांनी शिंदेसेनेच्या नरेश म्हस्के यांना पाठिंबा जाहीर केला आहे . 

मीरा भाईंदरचे पहिले नगराध्यक्ष आणि पहिले आमदार राहिलेले गिल्बर्ट मेंडोन्सा यांची एकेकाळी शहरात एकहाती सत्ता होती . महापालिका झाल्यावर शहराच्या पहिल्या महापौर म्हणून त्यांच्या पत्नी मायरा मेंडोन्सा निवडून आल्या होत्या . त्यांची मुलगी कॅटलीन देखील महापौर होत्या . वय आणि प्रकृती मुळे गेल्या काही काळात सक्रिय राजकारणा पासून काहीसे दूर असले तरी आजही शहरात गिल्बर्ट मेंडोन्सा यांना मानणारा  मोठा वर्ग आहे . 

राष्ट्रवादी काँग्रेस मधून शिवसेनेत आलेले मेंडोन्सा हे शिवसेनेतील फुटी नंतर कोणत्याही गटात सहभागी झाले नव्हते . परंतु अडचणीच्या काळात तत्कालीन नगरविकास मंत्री असताना एकनाथ शिंदे यांनी केलेली मदत ते आजही बोलून दाखवतात . तर खासदार राजन विचारे यांच्याशी देखील मेंडोन्सा यांचे चांगले संबंध आहेत . त्यातूनच शिंदे यांनी मेंडोन्सा यांना भेटीसाठी बोलावले होते . मेंडोन्सा हे जावई स्कुपी परेरा यांच्यासह शिंदे यांना भेटले. ठाण्याच्या माजी महापौर मीनाक्षी शिंदे उपस्थित होत्या . लोकसभा निवडणुकीत नरेश म्हस्के यांच्या प्रचारासाठी व निवडून आणण्यासाठी सहकार्य करण्यास मुख्यमंत्र्यांनी सांगितले व त्यास मेंडोन्सा यांनी होकार दर्शवला . 

दरम्यान शिंदेसेनेचे उमेदवार नरेश म्हस्के यांनी मेंडोन्सा यांची भाईंदर येथे भेट घेतली . यावेळी कॅटलीन परेरा आदी उपस्थित होते . मेंडोन्सा यांनी त्यांच्या कार्यकर्ता  व समर्थकांना शिंदे सेनेच्या म्हस्के यांना मतदान करण्याचे आणि निवडून आणण्याचे आवाहन केले आहे . 

मेंडोन्सा यांच्या भूमिके मुळे उत्तन भागातील शिवसैनिक संभ्रमात 

गिल्बर्ट मेंडोन्सा यांनी शिंदेसेनेचे म्हस्के यांना पाठिंबा जाहीर केला आहे . उत्तन भागात मेंडोन्सा यांना मानणारा मोठावर्ग आहे . मेंडोन्सा यांच्यासह ह्या भागातील नगरसेवक , पदाधिकारी आदी शिवसेनेत गेले होते . शिवसेना फुटी नंतर देखील येथील तत्कालीन नगरसेवक ,पदाधिकारी व कार्यकर्ते हे उद्धवसेनेचे खासदार राजन विचारे यांच्या सोबत राहिले . विचारे यांनी ह्या भागातील मच्छिमारांसाठी अनेक विकासकामे केली आहेत . आता मेंडोन्सा यांच्या भूमिके मुळे येथील शिवसैनिक संभ्रमात पडले आहेत . त्यांच्या या बाबत बैठका व चर्चा देखील सुरु झाल्या आहेत. मेंडोन्सा यांच्या भूमिके मुळे राजन विचारे यांच्या हक्काच्या मतांवर परिणाम होऊ शकतो . 

Web Title: Rajan vichare shocked; Former MLA Gilbert Mendonsa supports Naresh Mhaske

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.