कल्याणहून नवी दिल्लीला जाणाऱ्या प्रवाशांसाठी आजपासून `राजधानी'
By ऑनलाइन लोकमत | Published: January 18, 2019 04:23 PM2019-01-18T16:23:54+5:302019-01-18T16:24:12+5:30
भिवंडी व कल्याणवासीयांनाही दिल्लीला लवकर पोचता येणार असून, मध्य रेल्वे मार्गावरील पहिली राजधानी एक्सप्रेस उद्यापासून सुरू होत आहे.
डोंबिवली - भिवंडी व कल्याणवासीयांनाही दिल्लीला लवकर पोचता येणार असून, मध्य रेल्वे मार्गावरील पहिली राजधानी एक्सप्रेस उद्यापासून सुरू होत आहे. भाजपचे खासदार कपिल पाटील यांच्या प्रयत्नाने मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनस ते नवी दिल्लीपर्यंत धावणाऱ्या या गाडीला रेल्वेमंत्री पियूष गोयल यांच्या हस्ते हिरवा झेंडा दाखविण्यात येणार आहे.
कल्याणहून रेल्वेने दिल्लीला जाण्यासाठी किमान २४ तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. अनेक गाड्यांना तब्बल ३० तासांहून अधीक वेळ जातो. त्यातून प्रवाशांचे हाल होतात. त्यामुळे वेळ वाचविण्यासाठी अनेक प्रवाशी मुंबई सेंट्रलहून दिल्लीला जाणाऱ्या राजधानी एक्सप्रेसने प्रवास करतात. त्यांना कल्याणहून पोचण्यासाठी किमान दोन तासांचा अवधी लागतो. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेमार्गावरही राजधानी एक्सप्रेस सुरू करण्यासाठी खासदार कपिल पाटील यांनी प्रयत्न सुरू केला होता. त्यासाठी रेल्वे मंत्रालयाकडे पाठपुरावा केला जात होता. अखेर रेल्वे मंत्री पियूष गोयल यांच्या आदेशाने मुंबई छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन उद्यापासून राजधानी एक्सप्रेस सुरू होणार आहे. या गाडीने कल्याणहून दिल्लीत अवघ्या १८ तास ४२ मिनिटांत पोचता येईल. या गाडीला नाशिक, जळगाव, भोपाळ, झाशी, आग्रा कॅन्टोनमेंट थांबे देण्यात आले आहेत.
दर बुधवारी व शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरुन दुपारी २ वाजून ५० मिनिटांनी राजधानी एक्सप्रेस सुटणार आहे. ती दुपारी ३ वाजून ३६ मिनिटांनी कल्याणमध्ये पोचेल. तर दुसऱ्या दिवशी सकाळी १० वाजून २० मिनिटांनी गाडी दिल्लीत पोचणार आहे. या गाडीबद्दल खासदार कपिल पाटील यांनी रेल्वे मंत्री पियूष गोयल यांचे आभार मानले आहेत.