राजधानी एक्स्प्रेस दररोज सोडा- कपिल पाटील
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2019 01:26 AM2019-01-20T01:26:57+5:302019-01-20T01:27:00+5:30
रेल्वेने शनिवारपासून सुरू केलेल्या राजधानी एक्स्प्रेसचे कल्याण रेल्वेस्थानकात भाजपा आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी उत्साहात स्वागत केले.
डोंबिवली : रेल्वेने शनिवारपासून सुरू केलेल्या राजधानी एक्स्प्रेसचे कल्याण रेल्वेस्थानकात भाजपा आणि शिवसेना कार्यकर्त्यांनी उत्साहात स्वागत केले. खासदार कपिल पाटील यांनी या गाडीसाठी पाठपुरावा केला होता. दरम्यान, या गाडीचे आरक्षण पहिल्या पाच तासांतच फुल्ल झाल्याने ही गाडी आठवड्यात दोन वेळेऐवजी दररोज सोडावी, अशी मागणी रेल्वे मंत्रालयाकडे करण्यात येणार असल्याचे पाटील यांनी सांगितले.
रेल्वेमंत्री पीयूष गोयल यांनी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवर हिरवा झेंडा दाखवल्यानंतर ही गाडी कल्याण स्थानकात दुपारी ३ वाजून ३६ मिनिटांनी दाखल झाली. यावेळी खासदार डॉ. श्रीकांत शिंदे, कल्याण-डोंबिवलीच्या उपमहापौर उपेक्षा भोईर, महिला व बालकल्याण समितीच्या सभापती रेखा चौधरी, महापालिकेतील पक्षाचे गटनेते वरुण पाटील, नगरसेविका वैशाली पाटील, शहराध्यक्ष प्रेमनाथ म्हात्रे, परिवहन समितीचे सदस्य कल्पेश जोशी, भिवंडी तालुका सरचिटणीस राम माळी, युवा नेते नितीन कारभारी, ठाणे विभागाच्या महिला आघाडी अध्यक्षा शुभा पाध्ये व कार्यकर्त्यांनी या गाडीचे स्वागत केले.
कल्याणहून रेल्वेने दिल्लीला जाण्यासाठी २४ तासांपेक्षा जास्त वेळ लागतो. अनेक गाड्यांना ३० तासांहून अधिक वेळ जातो. त्यामुळे प्रवाशांचे हाल होतात. वेळ वाचवण्यासाठी अनेक प्रवासी पश्चिम रेल्वेमार्गाने दिल्लीला जाणाऱ्या राजधानी एक्स्प्रेसने प्रवास करतात. त्यासाठी कल्याणहून मुंबई सेंट्रल गाठण्यासाठी त्यांना किमान दोन तास अगोदर निघावे लागते. या पार्श्वभूमीवर मध्य रेल्वेमार्गावरही राजधानी एक्स्प्रेस सुरू करावी, अशी मागणी पाटील यांनी केली होती. या गाडीचा फायदा ठाणे जिल्ह्यातील प्रवाशांना होणार आहे.
>गाडीचे वेळापत्रक
राजधानी एक्स्प्रेस दरबुधवारी व शनिवारी छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसवरून दुपारी २ वाजून ५० मिनिटांनी सुटेल. ती दुसºया दिवशी सकाळी १० वाजून २० मिनिटांनी दिल्लीत पोहोचणार आहे. दिल्लीहून ही गाडी दरगुरुवारी आणि रविवारी दुपारी ३.१५ वाजता सुटून दुसºया दिवशी सकाळी ११.५५ वाजता छत्रपती शिवाजी महाराज टर्मिनसला पोहोचेल. या गाडीने कल्याणहून दिल्लीला १८ तास ४२ मिनिटांत पोहोचता येईल. या गाडीला कल्याण, नाशिक, जळगाव, भोपाळ, झाशी, आग्रा कॅन्टोन्मेंट येथे थांबे आहेत.