ठाण्याचे नवे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकरांनी पदभार स्विकारला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 14, 2018 03:24 PM2018-08-14T15:24:33+5:302018-08-14T15:29:03+5:30
आदेश प्राप्त होताच आज त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात जावून डॉ. कल्याणकर यांच्याकडून जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्विकारला. यावेळी डॉ. कल्याणकर यांनी प्रथम पुष्पगुच्छे देऊन नार्वेकरांचे स्वागत करून खुर्चीत विराजमान केले
ठाणे : जिल्हाधिकारी डॉ. महेंद्र कल्याणकर यांची बदली झाली असून ते आता मंत्रालयात उद्योग, कामगार विभागाची जबाबदरी पार पाडणार आहेत. तर त्यांच्या जागी मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांचे सहसचिव राजेश नार्वेकर यांची बदली झाली. मंगळवारी दुपारी त्यंनी ठाणे जिल्हाधिकरी पदाचा पदाभार ही स्विकारला.
पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्या हस्ते ७१ व्या स्वातंत्र्य दिनाचे ध्वजारोहण आता नवे जिल्हाधिकारी नार्वेकर यांच्या उपस्थितीत पार पडेल. आदेश प्राप्त होताच आज त्यांनी जिल्हाधिकाऱ्यांच्या दालनात जावून डॉ. कल्याणकर यांच्याकडून जिल्हाधिकारी पदाचा पदभार स्विकारला. यावेळी डॉ. कल्याणकर यांनी प्रथम पुष्पगुच्छे देऊन नार्वेकरांचे स्वागत करून खुर्चीत विराजमान केले. यानंतर पालकमंत्र्यांनी देखील भेट घेऊन नार्वेकर यांची पुष्पगुच्छे देऊन स्वागत केले. १५ आॅगस्टच्या मुहूर्तावर नव्या जिल्हाधिकाऱ्यांची उपस्थिती ही ठाणेकरांसाठी देखील नवी पर्वणीच असल्याचे शहरातील दिग्गजांकडून ऐकायला मिळत आहे.
राज्यात सर्वाधिक प्रगतीच्या वाटेवर ठाणे जिल्हा एकमेव जिल्हा आहे. त्यात मुख्यमंत्र्यांच्या कामकाजाची जबाबदारी पार पाडण्यात यशस्वी ठरलेले नार्वेकर, ठाणे जिल्हाधिकारी पदी विराजमान झाल्यामुळे ठाणेकरांसह जिल्ह्यातील नागरिकांसाठी हा दुग्ध शर्करा योग मानला जात आहे. मुख्यमंत्र्यांचे सहसचीव पदाची जबाबदारी पार पाडलेले नवे जिल्हाधिकारी नार्वेकर यांच्या नियंत्रणातील ठाणे जिल्ह्याच्या सर्वांगिण विकासाला आता चारचांद लागणार असल्याचे राजकीय वर्तुळात बोलले जात आहे.
शासनाच्या डिजिटल इंडिया कार्यक्रमांर्गत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयाला ‘डिजिटल चॅम्पियनशिप’ डॉ. कल्याणकर यांनी प्राप्त करून दिली. याशिवाय अनधिकृत रेती उत्खनन करणाºया रेतीमाफियांवर सडेतोड कारवाई करून राज्यात सर्वाधिक दंड वसुली त्यांनी करून दिली आहे. डॉ. कल्याणकर, यांच्या मार्गदर्शनाखाली राज्यात पहिले कौशल्य विकास केंद्र ठाणे येथे प्रथम सुरू झाले. दुपारी येथील जिल्हा नियोजन भवनमध्ये डॉ. कल्याणकर यांचा निरोप समारंभही त्वरीत पार पडला. यावेळी पालकमंत्र्यांनी त्यांचा सहपत्नीक सत्कार केला.