राजीव गांधी कॉलेजची मान्यता धोक्यात? ३० सप्टेंबरपर्यंत मेडिकल कौन्सिलने दिली होती मुदत
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 26, 2017 04:01 AM2017-09-26T04:01:17+5:302017-09-26T04:01:28+5:30
ठाणे महापालिकेच्या राजीव गांधी वैद्यकीय कॉलेजमधील त्रुटींबाबत योग्य ती माहिती सादर करण्यासाठी इंडियन मेडिकल कौन्सिलने येत्या ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली आहे.
ठाणे : ठाणे महापालिकेच्या राजीव गांधी वैद्यकीय कॉलेजमधील त्रुटींबाबत योग्य ती माहिती सादर करण्यासाठी इंडियन मेडिकल कौन्सिलने येत्या ३० सप्टेंबरपर्यंतची मुदत दिली आहे. परंतु, प्रशासनाच्या भोंगळ कारभारामुळे येथील प्रोफेसर आणि लेक्चरर्सच्या नियुक्त्या आणि बढत्या रखडल्या असल्याची बाब उघडकीस आली असून या त्रुटींची पूर्तता करणे तत्काळ शक्य नसल्याने या महाविद्यालयाची मान्यताच धोक्यात येण्याची चिन्हे दिसत आहेत.
ठाणे महापालिकेच्या छत्रपती शिवाजी महाराज रुग्णालयाशी संलग्न असलेले राजीव गांधी मेडिकल महाविद्यालय महापालिका चालवत आहे. या कॉलेजवर वर्षाकाठी सुमारे ४० कोटींचा खर्च केला जात असून येथील परिस्थिती आजही दयनीय आहे. मनमानी पद्धतीने नियुक्त्या, वाट्टेल त्याला पदोन्नती, आवश्यकता नसलेल्या जागांवर भरती, असे अनेक गैरप्रकार आहेत. आॅगस्ट महिन्यात एमसीआयच्या डॉ. भद्रेश व्यास, चनन्ना सी. आणि डॉ. नागरेखा यांनी कॉलेजची पाहणी केली. ५० विद्यार्थी क्षमता असलेल्या महाविद्यालयात जेवढ्या सुविधा आणि शिक्षक हवेत, त्यांची कमतरता आढळली. ३० टक्के पदांच्या कमतरतेचा ठपका त्यांनी ठेवला. कॉलेजलगतच विद्यार्थ्यांचे वसतिगृह नसून कॅन्टीनही बंद असल्याचे आढळले. प्रशिक्षित कर्मचाºयांना अप्रशिक्षित काम करण्यास भाग पाडले जात आहे. मेडिकल रेकॉर्डचे योग्य पद्धतीने कोडिंग होत नाही. या कॉलेजमध्ये चार गॅलरी लेक्चर हॉलची आवश्यकता असताना केवळ एकच आहे. काही डॉक्टरांची भरती एका विभागात आणि काम दुसºया विभागात सुरू असल्याचेही चौकशीत आढळले. एमसीएने या त्रुटी ३० सप्टेंबरपर्यंत दूर करण्याचे आदेश कॉलेज प्रशासनाला दिले होते. ती मुदत संपण्यास पाच दिवस शिल्लक असतानाही अनेक त्रुटी कायम आहेत. या कॉलेजात कार्यरत असलेल्या लेक्चरर्स, असोसिएट प्रोफेसर आणि प्रोफेसर्सना रीतसर बढती दिल्यानंतर रिक्त पदांसाठी नव्याने नियुक्ती करणे अपेक्षित होते. ती न करता पालिकेने जाहिरात प्रसिद्ध केल्यानंतर विद्यमान शिक्षकांनी त्याला आक्षेप नोंदवला. न्यायालयात दाद मागण्याचा इशारा दिल्यानंतर ही भरती प्रक्रियाच पालिकेला गुंडाळावी लागली.
- आरक्षित जागांतही प्रशासनाने घोळ घातला असून बिंदूनियमावली आणि एमसीआयचे निकष पायदळी तुडवले. एमसीएने काही तज्ज्ञांना बढती देण्याचे सांगूनही तशी ती न देता तात्पुरती भरती करून धूळफेक सुरू आहे. आॅफ्थर्मालॉजी, बायोकेमिस्ट्री, मायक्र ो बायोलॉजी आणि पॅथालॉजीत गरज नसताना पदे भरण्यात आली आहेत. मेडिकल सर्जरी, गायनॉकॉलॉजीत नेमलेले शिक्षक दुसºयाच विभागात कार्यरत आहेत. त्यामुळे या सावळ््यागोंधळाचा, अनागोंदीचा परिणाम कॉलेजच्या कारभारावर होतो आहे.