भिवंडीतील राजीवगांधी उड्डाणपुल वहातूकीसाठी होणार खुला, जड वहानांना बंदी
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: September 20, 2018 10:07 PM2018-09-20T22:07:59+5:302018-09-20T22:22:29+5:30
भिवंडी: शहरातील वाडारोड,कल्याणरोड आणि ठाणारोडला जोडणाऱ्या स्व.राजीवगांधी उड्डाणपुलाला पडलेले भगदाड दुरूस्त करण्याचे काम नुकतेच पुर्ण झाले असुन तब्बल पंधरा दिवसांनंतर उद्या शुक्रवारी या पुलावरून नियमीतपणे वहातूक सुरू होणार आहे. या उड्डाणपुलाचे आयुष्य वाढावे यासाठी पुलावरून जड व अवजड वहानांना कायमची बंदी करण्यात यावी,अशी मागणी शहरवासीयांकडून होऊ लागली आहे.
शहरात बारा वर्षापुर्वी बांधलेल्या राजीवगांधी उड्डाणपुलाच्या स्लॅबचा काही भाग उखडून, या पुलास पंधरादिवसांपुर्वी (५ सप्टेंबर)भगदाड पडले होते. एस.टी.स्थानकासमोरील या उड्डाणपुलाखाली असलेल्या शौचालयाजवळ सकाळच्या सुमारास पुलाच्या स्लॅबचा काही भाग कोसळल्याने शहरात हाहाकार माजला होता. याच दरम्यान नागरिकांनी उड्डाणपुलावरील वहातूक ताबडतोब बंद केली. महानगपालिकेचे आयुक्त मनोहर हिरे यांनी या घटनेची दखल घेत व्हिजेआयटी या संस्थेस लेखी पत्र देऊन उड्डाणपुलाचे स्ट्रक्चरल आॅडीट रिपोर्ट देण्यास सांगीतले आहे. हा स्ट्रक्चरल आॅडीटचा रिपोर्ट पालिकेकडे पुढील आठवड्यात येणार असल्याची माहिती आयुक्त हिरे यांनी दिली.तसेच एमएमआरडीएच्या अभियंत्यांनी देखील उड्डाणपुलाची माहिती घेऊन पुलाच्या दुरूस्ताबाबत सुचना केल्या. दरम्यान मनपा आयुक्तांनी उड्डाणपुलाचे ठेकेदार जे.कुमार अॅण्ड कंपनी यांना पाचारण करून त्यांच्याकडून पुलाची तपासणी करून त्यांच्याकडून पुलाच्या दुरूस्तीचे काम सुरू केले. हा विषय तांत्रीक असल्याने पुलाचे बांधकाम करणाºया जे अॅण्ड कंपनीने ही दुरूस्ती पंधरा दिवसांत केली. तर पालिकेने उड्डाणपुलावर असलेले खड्डे बुजविण्याकरीता चार लाखाचे डांबरीकरण केले आहे. पावसाचे पाणी जाण्यासाठी पाण्याचे पाईप साफ केले. महापालिकेने केलेली दुरूस्ती टिकावी आणि पुलाचे अधीक नुकसान होऊ नये म्हणून काही महिन्यांसाठी पुलाच्या दोन्ही टोकावर उंचीची मर्यादा असलेले गर्डर लावण्याचे काम सुरू केले असुन हे काम आज गुरूवार रोजी पुर्ण होणार आहे. उद्या शुक्रवार पासून या राजीवगांधी स्मृती उड्डाणपुलावरून नियमीत वहातूक सुरू होणार आहे.असे मनपा आयुक्त मनोहर हिरे यांनी सांगीतले. पुलाच्या दोन्ही टोकावर उंचीची मर्यादा असलेले गर्डर आहे तो पर्यंत या पुलावरून जाणाºया जडवहानांना आपोआपच मर्यादा येणार आहे. परंतू या उड्डाणपुलाचे आयुष्य वाढवायचे असल्यास या पुलावर जड व अवजड वहानांना कायमची बंदी घालावी,अशी मागणी शहरातील विविध स्तरांतून होऊ लागली आहे.
राजीवगांधी उड्डाणपुलाला भगदाड पडलेल्या घटनेस पंधरा दिवस झाले. उड्डाणपुलावर साचणा-या पाण्याचा निचरा करणे तसेच योग्य दुरूस्ती करणे या बाबत पालिकेच्या अभियंत्यांना हलगर्जीपणा केल्याने ही घटना घडल्याचा आरोप जनमानसांतून होत आहे. या घटनेनंतर पालिकेत स्थायी समितीची सभा आणि महासभा देखील झाली. परंतू उड्डाणपुलाची निगा व दुरूस्ती करण्यात हलगर्जीपणा करणा-या अधिका-यांना व अभियंत्यांना कोणी नगरसेवकांनी जाब विचारला नाही. उड्डाणपुलाची ही घटना एकाच दिवसांत घडणारी नसुन अनेक महिने केलेल्या दुर्लक्षामुळे ही घटना घडली आहे. त्याचा त्रास शहरातील नागरिकांना भोगावा लागला आहे. त्यामुळे हलगर्जीपणा करणा-या अभियंत्यांवर व अधिका-यांवर आयुक्तांनी कारवाई करावी,अशी मागणी नागरिक विकास प्रतिष्ठानचे रामदास दानवले यांनी केली आहे.