सीडीआर प्रकरणात रजनी पंडित यांची जामिनावर ठाणे कारागृहातून सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 14, 2018 05:59 PM2018-03-14T17:59:10+5:302018-03-14T17:59:10+5:30
देशातील पहिल्या महिला गुप्तहेर रजनी पंडित यांची बुधवारी सकाळी ठाणे मध्यवर्ती कारागृहातून जामिनावर सुटका करण्यात आली. बेकायदेशीर सीडीआर प्रकरणामध्ये त्यांना अटक करण्यात आली होती.
ठाणे : बेकायदेशीर सीडीआर (कॉल्सचा तपशील) प्रकरणामध्ये जवळपास एक महिन्यापासून न्यायालयीन कोठडीत असलेल्या देशातील पहिल्या महिला गुप्तहेर रजनी पंडित यांची अखेर बुधवारी सकाळी तुरूंगातून सुटका झाली.
सीडीआर प्रकरणामध्ये ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण शाखेने २ फेब्रुवारी रोजी रजनी पंडित यांना अटक केली होती. जवळपास ४0 दिवस त्या न्यायालयीन कोठडीत होत्या. अतिरिक्त सत्र न्यायाधिश ए.एस. भैसारे यांनी २0 हजार रुपयांच्या जात मुचलक्यावर सोमवारी त्यांचा जामीन अर्ज मंजूर केला होता. बुधवारी सकाळी १0 वाजताच्या सुमारास मध्यवर्ती कारागृहातून त्यांची सुटका करण्यात आली. सीडीआर प्रकरणात पोलिसांनी हिंदी चित्रपट अभिनेता नवाजुद्दीन सिद्दीकी यालाही चौकशीसाठी नोटीस बजावली आहे. नोटीस बजावून जवळपास आठ दिवस उलटलेत. मात्र नवाजुद्दीन अद्याप चौकशीसाठी हजर झालेला नाही. नवाजुद्दीन सिद्दीकी किंवा अन्य कुणाशीही आपला काहीही संबंध नसल्याचे रजनी पंडित यांनी सुटकेनंतर सांगितले. जवळपास ३0 वर्षांपासून खासगी गुप्तहेरीच्या क्षेत्रात कार्यरत असलेल्या रजनी पंडित आणि अन्य काही गुप्तहेरांसह ११ आरोपींना ठाणे पोलिसांनी अटक केली होती. आरोपींमध्ये यवतमाळ येथील एका पोलीस कर्मचाऱ्याचाही समावेश आहे.
सीडीआर प्रकरणामध्ये पोलिसांनी काही मोबाईल कंपन्यांकडून महत्वाची माहिती मागवली होती. ती माहिती पोलिसांना उपलब्ध झाली आहे. या माहितीचे विश्लेषण करण्याचे काम सुरू असल्याचे पोलिसांनी सांगितले. नजिकच्या काळात या प्रकरणातील आरोपींची संख्या आणखी वाढण्याची शक्यता असल्याचेही पोलिसांनी स्पष्ट केले.