गुप्तहेर रजनी पंडित यांची अखेर जामिनावर झाली सुटका
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: March 15, 2018 05:21 AM2018-03-15T05:21:44+5:302018-03-15T05:21:44+5:30
बेकायदा सीडीआर (कॉल्सचा तपशील) प्रकरणात जवळपास महिनाभर न्यायालयीन कोठडीत राहिलेल्या देशातील पहिल्या महिला गुप्तहेर रजनी पंडित यांची अखेर बुधवारी सुटका झाली.
ठाणे : बेकायदा सीडीआर (कॉल्सचा तपशील) प्रकरणात जवळपास महिनाभर न्यायालयीन कोठडीत राहिलेल्या देशातील पहिल्या महिला गुप्तहेर रजनी पंडित यांची अखेर बुधवारी सुटका झाली. मात्र, त्यांनी कारागृहामध्येही हेरगिरी सुरूच ठेवली. कैद्यांचे हाल, त्यांचे उपेक्षित आयुष्य आणि त्यामागची कारणे रजनी यांनी तपासली असून, त्या लवकरच यावर पुस्तकही लिहिणार आहेत.
सीडीआर प्रकरणात ठाण्याच्या गुन्हे अन्वेषण शाखेने २ फेब्रुवारीला रजनी पंडित यांना अटक केली होती. जवळपास ४० दिवस त्या न्यायालयीन कोठडीत होत्या. अतिरिक्त सत्र न्यायाधीश ए. एस. भैसारे यांनी २० हजारांच्या जात मुचलक्यावर सोमवारी त्यांचा जामीन मंजूर केला. सकाळी १० च्या सुमारास मध्यवर्ती कारागृहातून त्यांची सुटका करण्यात आली.
कारागृहात भल्या-भल्यांचा धीर खचतो. रजनी पंडित मात्र त्याला अपवाद ठरल्या. या काळात त्यांनी महिला कैद्यांचे समुपदेशन केले. महिला कैद्यांच्या मदतीसाठी कुणीच पोहोचत नाही. प्रसारमाध्यमांकडे किंवा अन्य कुणाकडे काही बोलल्यास त्याचा परिणाम खटल्यावर होईल, अशी भीती कैद्यांना दाखविली जाते. त्यामुळे अनेक कैदी नैराश्याच्या गर्तेत सापडले असल्याचे पंडित यांनी सांगितले. सीडीआर प्रकरणाबाबत बोलताना, त्यांनी न्यायव्यवस्थेवर विश्वास असल्याचे सांगितले. मानसिकदृष्ट्या खचलेल्या कैद्यांचे समुपदेशन करून हा काळही आपण सत्कारणी लावला, असेही त्या म्हणाल्या.
>सत्य शोधून काढणार
सीडीआर प्रकरणात आपणास का गोवण्यात आले, याचे सत्य शोधून काढल्याशिवाय स्वस्थ बसणार नाही, असा इशारा जवळपास ३0 वर्षांपासून खासगी गुप्तहेर म्हणून काम करणाऱ्या रजनी पंडित यांनी दिला. शेवटी मी एक गुप्तहेर आहे. अनेक प्रकरणांचा छडा मी आजवर लावला आहे. त्यामुळे या प्रकरणाचाही तळ गाठून सत्य शोधून काढू, असे पंडित यांनी सांगितले.