राज यांची सभा ‘गडकरी’समोर, आग्रह सोडला : ठाणेकरांची गैरसोय टाळण्यासाठी निवडला पर्याय
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 15, 2017 02:11 AM2017-11-15T02:11:58+5:302017-11-15T02:12:15+5:30
मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला अखेर पोलिसांनी परवानगी दिली असून गडकरी रंगायतन समोरील डॉ. मुस रोड या ठिकाणी ती होणार आहे.
ठाणे : मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांच्या सभेला अखेर पोलिसांनी परवानगी दिली असून गडकरी रंगायतन समोरील डॉ. मुस रोड या ठिकाणी ती होणार आहे. अशोक टॉकीजजवळ होणारी सभा ठाणेकरांच्या सोयीसाठी बदलण्यात आल्याचे पक्षाकडून सांगण्यात आले.
येत्या शनिवारी, १८ नोव्हेंबर रोजी राज यांची सभा होणार असून ठाण्यातील पदाधिकाºयांकडून परवानगी व जागेकरिता धावपळ सुरू होती. सेंट्रल मैदान, तलावपाळी, अशोक टॉकीज जवळच्या जागा सभेसाठी पाहिल्यानंतर पोलिसांनी परवानगी नाकारली. पोलीस परवानगी देण्यास का-कू करित असल्याचे पाहिल्यावर सोमवारी पक्षाच्या पदाधिकाºयांनी अशोक टॉकीज परिसरात सभा होण्याचे जाहीर केले. मंगळवारी मनसे नेते बाळा नांदगावकर ठाण्यात सभेची जागा पाहण्यासाठी आले. त्यावेळी त्यांनी पोलीस अधिकाºयांची भेट घेतली. यावेळी मनसे उपाध्यक्ष अभिजीत पानसे, ठाणे शहर अध्यक्ष अविनाश जाधव हेही उपस्थित होते. पोलिसांशी झालेल्या चर्चेअंती अखेर गडकरी रंगायतन समोरील डॉ. मूस रोडची जागा निश्चित करण्यात आली.
अशोक टॉकीज परिसरात सभा घेतल्यास स्टेशनवरुन येणाºया लोकांना अडथळा होऊ शकतो, असे पोलिसांचे मत असल्याने ती जागा बदलण्यात आल्याचे जाधव यांनी सांगितले. जागा निश्चित झाल्याने पक्षातील पदाधिकारी, कार्यकर्त्यांच्या बैठका सुरू झाल्या असून सभेचे होर्डींग्ज लावले जाणार आहेत, सोशल मीडियावरही सभेची प्रसिद्धी केली जाणार असून पथनाट्याच्या माध्यमातून सहभागी होण्याचे आवाहन नागरिकांना केले जाणार आहे.
दुपारी मी तलावपाळी, अशोक टॉकीज आणि गडकरी रंगायतन समोरील जागांची पाहणी केली. यात गडकरी रंगायतनच्या समोरील जागा अत्यंत उत्तम वाटते. अशोक टॉकीजजवळ रहदारी असते. तेथे सभा घेतल्यास रहदारीला त्रास होण्याची शक्यता होती. त्यामुळे जागा बदलली. जागा निश्चित झाल्यावर ताबडतोब राज ठाकरेंना कळवले. उपायुक्त स्वामी आणि उपायुक्त काळे यांच्याशी चर्चा करुन सभेची जागा निश्चित केली. - बाळा नांदगावकर, मनसे नेते
३० ते ३५ हजार नागरिक या सभेला हजर राहतील, अशी मनसे पदाधिकाºयांची अपेक्षा आहे. लोकांची गर्दी वाढल्याने जागा कमी पडल्यास बाजूचा रस्ताही घेण्याचा विचार आहे, असे अविनाश जाधव यांनी सांगितले.