उल्हासनगरात कलानी विरुद्ध राजवानी आमने-सामने
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: February 26, 2021 10:56 PM2021-02-26T22:56:23+5:302021-02-26T22:56:29+5:30
कमलेश निकमवर गुन्हा दाखल : वादग्रस्त वक्तव्य भोवले
सदानंद नाईक
उल्हासनगर : ओमी कलानी टीमचे प्रवक्ता कमलेश निकम यांच्या वादग्रस्त वक्तव्यावर राष्ट्रवादी पक्षाचे गटनेता व सभागृहनेते भरत राजवानी (गंगोत्री) यांनी आक्षेप घेऊन हिललाईन पोलीस ठाण्यात तक्रार केली. तिखी दखल घेऊन पोलिसांनी निकम यांच्यावर गुन्हा दाखल केल्याने भरत राजवानी (गंगोत्री) विरुद्ध कलानी असा सामना रंगण्याची शक्यता व्यक्त होत आहे.
माजी आमदार ज्योती कलानी यांच्या वाढदिवसानिमित्त १७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी भाटिया चौकात कार्यक्रमाचे आयोजन केले होते. यावेळी ओमी कलानी टीमचे प्रवक्ता कमलेश निकम यांनी १९९० च्या दरम्यान पप्पू कलानी यांच्याशी एका राजवानी नावाच्या इसमाने टक्कर दिल्यावर त्याचे काय झाले. तसेच ओमी यांच्यासोबत कोणी एका राजवानी नावाच्या इसमाने टक्कर दिल्यास त्याचेही तसेच होणार असल्याचे वक्तव्य केले.
हा कार्यक्रम राष्ट्रवादी पक्षाचे गटनेते, सभागृहनेते व कलानी यांचे राजकीय विरोधक भरत राजवानी (गंगोत्री) यांच्या घरासमोरील भाटिया चौकात झाला. निकम यांच्या वक्तव्यावर गंगोत्री यांनी आक्षेप घेऊन यामुळे आपल्या जीविताला धोका निर्माण झाला असल्याची तक्रार हिललाईन पोलीस ठाण्यात केली. यानंतर पोलिसांनी निकम यांच्यावर गुन्हा दाखल केला.
पप्पू कलानी यांचे राजकीय स्पर्धक म्हणून गोपाल राजवानी १९९० सालानंतर पुढे आले. महापालिका स्थापन झाल्यावर त्यांची उल्हासनगर न्यायालयाच्या प्रांगणातच हत्या झाली होती. यामध्ये पप्पू कलानी यांच्यासह अन्य जण आरोपी होते. आता भाटिया चौकातील कार्यक्रमात निकम यांनी केलेल्या वक्तव्यामुळे आपल्या जीवाला धोका असल्याची तक्रार भरत राजवानी यांनी हिललाईन पोलीस ठाण्यात केली. तिची दखल घेऊन निकम यांच्यावर पोलिसांनी हा गुन्हा दाखल केला आहे.