अंबरनाथच्या विद्यार्थ्यांनी बनवल्या सैनिकांसाठी राखी; महात्मा गांधी विद्यालयाच्या विद्यार्थ्यांचा अनोखा उपक्रम
By पंकज पाटील | Published: August 26, 2023 06:40 PM2023-08-26T18:40:44+5:302023-08-26T18:42:26+5:30
Thane: 'एक राखी सैनिकांसाठी' या उपक्रमांतर्गत अंबरनाथच्या महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शाळेतच राखी बनवण्याचे काम सुरू केले आहे. आपल्या हाताने बनवलेली राखी सीमेवर संरक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी पाठवण्यात येणार आहे.
- पंकज पाटील
अंबरनाथ - 'एक राखी सैनिकांसाठी' या उपक्रमांतर्गत अंबरनाथच्या महात्मा गांधी विद्यालयातील विद्यार्थ्यांनी शाळेतच राखी बनवण्याचे काम सुरू केले आहे. आपल्या हाताने बनवलेली राखी सीमेवर संरक्षण करणाऱ्या सैनिकांसाठी पाठवण्यात येणार आहे.
दि एज्युकेशन सोसायटी अंबरनाथचे महात्मा गांधी विद्यालय हे नित्य नवीन उपक्रमांसाठी ओळखले जाते. या विद्यालयातील इयत्ता पाचवी ते दहावी चे विद्यार्थी यावर्षी सुमारे महिनाभर एका वेगळ्या धाग्याने एकमेकांशी जोडले गेले होते. हा बंध होता राखी बनवणे या उपक्रमाचा! स्वतः एखादी वस्तू बनवण्याचा आनंद या विद्यार्थ्यांनी या उपक्रमाच्या निमित्ताने उपभोगला. तीन ते साडेतीन हजार राख्या स्वतः तयार केल्या. सीमेवर अहोरात्र तैनात असणारा सैनिक सण समारंभाच्या निमित्ताने आपल्या घरी येऊ शकत नाही, पण त्याच्याप्रती कृतज्ञतेची भावना आपल्या सगळ्यांच्याच मनात असते. ती व्यक्त करण्यासाठी यातील 55 राख्या जवानांना पाठवण्यात आल्या. यात नौदल प्रमुखांचाही समावेश आहे.अंबरनाथ मधील प्रतिष्ठित नागरिक, आरोग्य विभाग, पंचायत समिती, पोलीस स्टेशन, नगरपरिषद, अग्निशमन दल, महाराष्ट्र राज्य वीज वितरण मंडळ या सर्व विभागात कार्यरत असणारे अधिकारी व कर्मचारी हे सुद्धा आपल्यासाठीच काम करत असतात, त्या सर्वांना विद्यालयातील विद्यार्थिनी राखी बांधणार आहेत. यातून समाज व प्रशासन यांच्यात एक सुरेख नाते तयार व्हायला मदत होणार आहे.
उपक्रमासाठी विद्यालयातील जान्हवी जागरे, सारिका कान्हेरकर, सुरेखा शिंदे, मनीषा गवारी, भरत आवारे, संजय चंदन, विजय विरणक, विनायक बारे हे शिक्षक , तसेच प्राची नेतनराव, पूर्वा गायकवाड, कोमल गुंजाळ, आदिती अढांगळे देवकी तुपदोर,आदिती जांभळे या विद्यार्थिनींच्या मदतीने राख्या बनवल्या गेल्या. मुख्याध्यापक संतोष भणगे , पदाधिकारी नयना गुळीक, सुरेश मोरे यांच्या मार्गदर्शनाखाली यशस्वीरित्या हा उपक्रम करण्यात येत आहे. रक्षाबंधनाच्या निमित्ताने विद्यार्थी आणि शाळेने जपलेली सामाजिक बांधिलकी महत्वपूर्ण ठरत आहे.