राखी पौर्णिमेमुळे एसटींची संख्या वाढली
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 21, 2021 04:45 AM2021-08-21T04:45:04+5:302021-08-21T04:45:04+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क कल्याण : कोरोनाचे निर्बंध शिथिल केल्याने बस प्रवासाला १०० टक्के क्षमतेने प्रवासाची मुभा आहे. त्याचबरोबर ...
लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : कोरोनाचे निर्बंध शिथिल केल्याने बस प्रवासाला १०० टक्के क्षमतेने प्रवासाची मुभा आहे. त्याचबरोबर उपनगरीय रेल्वे प्रवासी गाड्यांमधून दोन डोस घेतलेल्या प्रवाशांना प्रवास करण्याची मुभा राज्य सरकारने दिली आहे. त्यामुळे रेल्वे आणि बसची सेवा बहुतांश सुरू आहे. त्याचा फायदा भाऊ-बहिणीला होणार आहे. कोरोनाकाळात त्यांना प्रवास करून एकमेकांसोबत राखी पौर्णिमेचा सण साजरा करता येणार आहे.
कल्याणहून एसटीसह रेल्वे प्रवासाकरिता लांब पल्ल्याच्या गाड्या सोडल्या जातात. त्यामुळे या जंक्शनवर सार्वजनिक प्रवासी वाहतुकीची मोठी मदार आहे. कल्याण एसटी डेपोतून दररोज ६० बस चालविल्या जातात.
-------------------------------------
या मार्गांवर वाढल्या फेऱ्या
कल्याण-पुणे
कल्याण-अलिबाग
कल्याण-नाशिक
कल्याण-अहमदनगर
कल्याण-पनवेल
-------------------------------------
सध्या सुरू असलेल्या रेल्वे
सध्या दोन डोस घेतलेल्या सर्वसामान्य प्रवाशांना उपनगरीय रेल्वे प्रवासाची मुभा आहे. त्यापूर्वी अँटिजन आणि आरटीपीसीआर टेस्ट केली जाते. लांब पल्ल्याच्या गाड्यांतून प्रवासास दोन डोसची सक्ती नाही. त्यामुळे पुणे, नाशिक, मनमाड, जळगाव, सोलापूर, कोल्हापूर, नागपूर, नांदेड या गाड्या सुरू आहेत.
-------------------------------------
प्रवाशांची गर्दी
निर्बंध शिथिल केल्याने कल्याण-पनवेल, कल्याण-भिवंडी, कल्याण-वाडा, कल्याण-मुरबाड या मार्गांवर गर्दी आहे. कारण भिवंडी, वाडा, मुरबाडकडे रेल्वे नाही. तर पनवेल आणि नवी मुंबई, ठाण्याला जाण्यासाठी रेल्वेची मुभा असली तरी दोन डोसची अट पूर्ण केलेल्या नागरिकांची संख्या कमी आहे. त्यामुळे पुन्हा त्यांच्या प्रवासाची मदार एसटीवरच आहे.
--------------------------------------
कल्याण बस डेपोतून सध्या एकूण ६० बस चालविल्या जात आहेत. त्यात लांब पल्ल्याच्या गाड्यांचा समावेश आहे. राखी पौर्णिमेला शनिवारी सकाळपासून जादा बस सोडल्या जाणार आहेत. किमान १० जादा बसचे नियोजन आहे. दहा दिवसांपूर्वी साडेपाच लाख रुपये उत्पन्न होते. आता ते साडेसहा लाख झाले आहे.
- विजय गायकवाड, बस डेपो व्यवस्थापक, कल्याण.
--------------------------------------