राख्यांच्या बाजारात यंदा शेणाच्या राखीचा बोलबाला
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 19, 2021 04:44 AM2021-08-19T04:44:00+5:302021-08-19T04:44:00+5:30
लोकमत न्यूज नेटवर्क ठाणे : बहीण-भावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणजेच रक्षाबंधन. येत्या रविवारी हा सण असल्याने दोन आठवड्यांपासून विविध ...
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : बहीण-भावाच्या पवित्र नात्याचा सण म्हणजेच रक्षाबंधन. येत्या रविवारी हा सण असल्याने दोन आठवड्यांपासून विविध प्रकारच्या राख्यांनी शहरातील बाजारपेठा सजल्या आहेत. यंदा शेणाच्या राखीचा बोलबाला आहे, तर रेजीन राख्यांनादेखील पसंती आहे. दुकानांत पारंपरिक राख्याही विक्रीस आल्याचे पाहायला मिळत आहे.
रक्षाबंधन काही दिवसांवर येऊन ठेपले आहे. त्यामुळे बाजारपेठांत विविध प्रकारच्या राख्यांनी दुकाने सजली आहेत. गेल्यावर्षी लॉकडाऊनचे निर्बंध आणि दुकानांच्या मर्यादित वेळा यामुळे राख्यांच्या विक्रीवर मोठा परिणाम झाला होता. गेल्यावर्षी खूप कमी प्रमाणात राख्यांची विक्री झाली होती. परंतु, यंदा चित्र बदलले असल्याचे दिसून येत आहे. दुसऱ्या अनलॉकमध्ये रात्री दहा वाजेपर्यंत दुकाने सुरू ठेवण्याची परवानगी असल्याने ठाणे शहरातील बाजारपेठा तसेच, नौपाडा, गोखले रोड, घोडबंदर रोड, वागळे इस्टेट, लोकमान्य नगर अशा विविध ठिकाणी असलेल्या दुकानांत राख्यांची विक्री सुरू झाली आहे. बाहेरगावी पाठवायच्या राख्यांची खरेदी दोन महिन्यांपूर्वीच सुरू झाली होती. आता जवळपास राहणाऱ्या भावांसाठी बहिणी राख्या खरेदी करीत आहेत. यंदा काही नव्या प्रकारच्या राख्या आल्या असून त्या सर्वांचे लक्ष वेधून घेत आहेत. मात्र, यंदा किमतीदेखील दहा टक्क्यांनी वाढल्या आहेत. पर्यावरणस्नेही असलेल्या शेणाच्या राखीला प्रचंड पसंती आहे, असे राखी विक्रेत्या दीप्ती साडविलकर यांनी सांगितले. खतासाठी या राख्यांचा वापर होऊ शकतो. यात बियादेखील टाकल्या आहेत. जेव्हा ही राखी मातीत फेकली जाईल, तेव्हा ती मातीत मिश्रित होईल. ही राखी पूर्णतः पर्यावरणस्नेही आहे, असे दीप्ती यांनी सांगितले. घुंगरू, मण्यांचादेखील वापर या राखीत केला आहे. या राखीचा दर ३० रुपयांपर्यंत आहे.
-----------------------
रेजिन राख्यांचाही ट्रेंड
ट्रे, किचेन, बुक मार्कपासून डायरीपर्यंत वापरण्यात येणाऱ्या रेजिनचा उपयोग राख्यांमध्ये करण्यात आला आहे. या राख्यांत विविध रंग वापरून त्यांना आकर्षक बनविण्यात आले आहे. ८० रुपये असा या राखीचा दर आहे, असे राखी विक्रेत्या जयश्री शाह यांनी सांगितले.
-----------------------
चांदीच्या राख्यांनाही पसंती
नेहमीप्रमाणे चांदीच्या राख्या सोने-चांदीच्या व्यापाऱ्यांकडे विक्रीसाठी उपलब्ध आहेत. ओम, स्वस्तिक, चेन, रुद्राक्ष असे अनेक प्रकार या राख्यांमध्ये पाहायला मिळत आहेत. या राख्यांची किंमत २०० पासून अडीच हजार रुपयांपर्यंत आहे. परंतु, ७०० पासून एक हजार रुपयांपर्यंतच्या रुद्राक्ष राख्यांना जास्त मागणी असल्याचे कमलेश जैन यांनी सांगितले.