सुरक्षित प्रवासाची सेवा देणाऱ्या उपनगरी रेल्वेच्या मोटरमनला राखी बांधून ठाण्यात रक्षाबंधन
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: August 23, 2021 04:43 AM2021-08-23T04:43:06+5:302021-08-23T04:43:06+5:30
ठाणे : कोरोना आपत्ती असो की मुसळधार पाऊस, कोणत्याही संकटात कामावर तत्परतेने हजर राहून कर्तव्य बजावीत लाखो महिलांना सुरक्षित ...
ठाणे : कोरोना आपत्ती असो की मुसळधार पाऊस, कोणत्याही संकटात कामावर तत्परतेने हजर राहून कर्तव्य बजावीत लाखो महिलांना सुरक्षित प्रवासाची सेवा देणाऱ्या लोकलच्या अर्थात उपनगरी रेल्वेच्या मोटरमनला महिलांनी राखी बांधून रविवारी रक्षाबंधन साजरे केले. ठाण्यातील विश्वास सामाजिक संस्थेचे अध्यक्ष तसेच भाजपचे ज्येष्ठ नगरसेवक संजय वाघुले आणि त्यांची कन्या वृषाली वाघुले यांनी हा नावीन्यपूर्ण उपक्रम राबविला.
लाखो चाकरमानी महिला लोकलने प्रवास करतात. सध्या कोरोनामुळे प्रवाशांची संख्या तुलनेने कमी आहे. परंतु, कोणत्याही आपत्तीमध्ये उपनगरी रेल्वेचे चालक कर्तव्यावर हजर राहून आपले कर्तव्य चोख बजावत असतात. त्यांच्याप्रति ऋण व्यक्त करण्याबरोबरच एक भाऊ म्हणून महिलांच्या सुरक्षित प्रवासासाठी मदत करणाऱ्या मोटरमन्सला राख्या बांधण्यात आल्या. नगरसेवक संजय वाघुले तसेच त्यांची कन्या वृषाली यांच्या मार्गदर्शनाखाली भाजपच्या पदाधिकारी विशाखा कणकोस, सई कारुळकर, राणी क्षीरसागर आणि शीतल अंदुरे यांनी हा उपक्रम राबविला.