गर्दीच्या ‘सुरक्षे’साठी रिक्षांच्या परवाने जप्तीची सक्ती!
By admin | Published: January 10, 2017 06:45 AM2017-01-10T06:45:26+5:302017-01-10T06:45:26+5:30
रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त साकेत मैदानावर वाहतूक शाखेच्या वतीने सोमवारी आयोजित कार्यक्रमामध्ये
ठाणे : रस्ता सुरक्षा सप्ताहानिमित्त साकेत मैदानावर वाहतूक शाखेच्या वतीने सोमवारी आयोजित कार्यक्रमामध्ये आॅटोरिक्षाचालकांनी हजर राहावे, यासाठी त्यांचे वाहन चालवण्याचे परवाने पोलिसांनी अगोदरच जमा केले होते. पोलिसांच्या या अभिनव सक्तीमुळे कार्यक्रम यशस्वी झाला. परंतु, त्यामुळे आर्थिक भुर्दंड बसलेल्या आॅटोचालकांनी नाराजी व्यक्त केली.
भारतीय क्रिकेट संघाचे माजी कर्णधार कपिल रावदेव यांच्या उपस्थितीत माझी रिक्षा, माझी दीक्षा या कार्यक्रमाचे आयोजन केले होते. कार्यक्रमाची वेळ दुपारी १ वाजताची असली तरी आॅटोचालकांना १२ वाजताच हजर राहण्यास सांगण्यात आले होते. त्यांनी हजर राहावे, याचे नियोजन वाहतूक शाखेने अगोदरच केले होते. केवळ तोंडी सांगून आॅटोचालक कार्यक्रमाला येणार नाहीत, हे वाहतूक पोलिसांनी हेरले होते. त्यावर उपाय म्हणून त्यांचे परवाने स्वत:च्या ताब्यात घेण्याचा कार्यक्रम वाहतूक पोलीस गेल्या काही दिवसांपासून राबवत होते. कार्यक्रमाला या आणि कार्यक्रम आटोपल्यानंतर परवाने घेऊन जा, असे त्यांना बजावण्यात आले होते. परवाने जमा करण्याचा हा कार्यक्रम किती प्रामाणिकपणे राबवण्यात आला, हे आॅटोचालकांच्या उपस्थितीवरून दिसून आले. कार्यक्रमासाठी उभारलेला मंडप आॅटोचालकांनी हाऊसफुल्ल झाला होता. जवळपास २०० चालक कार्यक्रमासाठी रिक्षा घेऊन हजर होते.
कार्यक्रम आॅटोरिक्षाचालकांच्या हिताचाच होता. सामान्य नागरिकांना आॅटोरिक्षाचालकांकडून बरेचदा चांगले अनुभव येत नाहीत. जवळच्या भाड्यासाठी नकार देणे, शहराची माहिती नसलेल्या प्रवाशांना जाणीवपूर्वक लांबच्या रस्त्याने नेणे, रात्रीच्या वेळी अव्वाच्या सव्वा भाडे उकळणे, असे प्रकार नेहमीच घडतात. वाहतूक नियम धाब्यावर बसवण्यात आघाडीवर कोण, या प्रश्नावर मत जाणूस घेतल्यास सर्वाधिक ठाणेकर आॅटोचालकांनाच दोष देतील, यात शंका नाही. त्यामुळे अशा प्रकारच्या कार्यक्रमांमधून आॅटोचालकांचे वेळोवेळी प्रबोधन होणे अत्यावश्यक असते, यातही शंका नाही. कार्यक्रमासाठी त्यांचे परवाने जमा करण्यामागे वाहतूक पोलिसांचा उद्देश वाईट नव्हता, हेही खरे. परंतु, असे कार्यक्रम प्रत्यक्षात किती उपयुक्त ठरतात, हा स्वतंत्र संशोधनाचा मुद्दा आहे. (प्रतिनिधी)