टिटवाळा रेल्वे स्थानक ते गणपती मंदिर रस्त्यावर मोकाट जनावरांचा सुळसुळाट
By ऑनलाइन लोकमत | Published: October 6, 2019 06:16 PM2019-10-06T18:16:31+5:302019-10-06T18:16:55+5:30
टिटवाळा हे शहर गणपती बाप्पाच्यामुळे सध्या संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात प्रसिद्धीला पावत आहे.
उमेश जाधव
टिटवाळा-: येथील टिटवाळा गणपती मंदिर ते रेल्वे स्थानक या मुख्य रस्त्यावर मोकाट गुरांचा सुळसुळाट सुरू झाला असून, मुख्य रस्त्यावर ठिय्या आंदोलन सुरू केले आहे श. त्यामुळे याठिकाणी अपघातांचा धोका वाढला आहे. या मोकाट जनावरांचा वेळीच बंदोबस्त केला नाही तर या रस्त्यावर भविष्यात मोठा अपघात होऊन नाहक प्रवाशांचा बळी जाण्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. या मुख्य रस्त्यावर जागोजागी मोकाट जनावरे ठाण मांडून बसले असे चित्र दिसून येत आहे. त्यामुळे भरधाव वाहनामुळे याठिकाणी मोठे अपघात होण्याचा धोका वाढला आहे.
टिटवाळा हे शहर गणपती बाप्पाच्यामुळे सध्या संपूर्ण राज्यात मोठ्या प्रमाणात प्रसिद्धीला पावत आहे. या ठिकाणी दररोजच भाविकांची कमालीची वर्दळ असते. दरम्यान टिटवाळा रेल्वे स्थानक ते गणपती मंदिर या रस्त्यावर मोठ्या प्रमाणात रहदारी असते. याच मुख्य रस्त्यावर सध्या मोकाट जनावरांचा सुळसुळाट सुरू झाल्याने रस्त्याच्या मध्यभागी ही मोकाट जनावरे ठिय्या मांडून बसलेली असतात.
यामुळे भरधाव वेगाने येणा-या वाहनांना मोठ्या प्रमाणात अडचणी निर्माण होऊन यामुळे याठिकाणी मोठे अपघात होऊ शकतात. तसेच या मोकाट जनावरांमुळे या ठिकाणी सतत वाहतूक कोंडी देखील होत आहे. या जनावरांमुळे याठिकाणी छोटे मोठे अपघात देखील झालेले आहेत. रात्रीच्यावेळी तर कित्येक वाहनचालकांच्या जिवावर बेतले आहे. या रस्त्यावरून रिक्षा, दुचाकी, चारचाकी व इतर अनेक वहानांची दिवस भर सतत रहदारी असते. सदर जनावरा़ंचा वेळीच बंदोबस्त करण्यात यावा अशा प्रकारची मागणी याठिकाणी होत आहे. तसेच या जनावरांच्या मालकांवर पोलीसांनी कारवाई करावी अथवा सदरची जनावरे पांजरपोळ येथे जमा करावी अशी मागणी देखील जोर धरत आहे.