"राम मंदिरामुळे 'भारत' जगाचा मार्गदर्शक"
By प्रज्ञा म्हात्रे | Published: January 11, 2024 02:08 PM2024-01-11T14:08:19+5:302024-01-11T14:08:30+5:30
इतिहास अभ्यासक मोहन शेटे यांचे प्रतिपादन
ठाणे : छत्रपती शिवरायांचा ३५० वा शिवराज्यभिषेक दिन यंदा साजरा होत आहे, त्याचवर्षी अयोध्येत ४९६ वर्षानी पुन्हा रामलल्लाचे मंदिर उभे राहत आहे. ही एकप्रकारे शिवरायांना आदरांजली असून २०२४ हे वर्ष युगप्रवर्तक असेल. तेव्हा, भारत आता जगाचा मार्गदर्शक बनणार असून याचे प्रतिक हे राममंदिर असणार आहे, असे प्रतिपादन इतिहास अभ्यासक, शिवभक्त मोहन शेटे यांनी केले.
ठाण्यात सुरू असलेल्या ३८ व्या रामभाऊ म्हाळगी स्मृती व्याख्यानमालेत "शिवरायांचा आठवावा प्रताप" हे दुसरे पुष्प मोहन शेटे यांनी गुंफले. यावेळी या सत्राचे अध्यक्ष भाजपच्या आयुष्यमान भारतचे ठाणे शहर संयोजक कैलास म्हात्रे, सुहास जावडेकर, परिवहन सदस्य विकास पाटील आणि व्याख्यानमाला समितीचे अध्यक्ष तथा आमदार संजय केळकर उपस्थित होते.
आपल्या त्वेषपूर्ण व्याख्यानात मोहन शेटे यांनी, छत्रपती शिवाजी महाराजांच्या पराक्रमांची गाथा श्रोत्यांसमोर उलगडताना ६ जून १६७४ च्या छत्रपतींच्या राज्याभिषेकाचे महत्त्व विषद केले.शिवरायांचा राज्याभिषेक म्हणजे जनतेप्रती स्वराज्यातील सर्वभौमत्व होते. याच शिवराज्यभिषेकाच्या ३५० व्या वर्षी अयोध्येत रामलल्लाचे मंदिर उभे झाले, हीच शिवरायांना खरी आदरांजली असुन बाबराचा एक कलंक पुसला जात आहे.२२ जाने. रोजी लोकार्पण होणारे राम मंदिर केवळ दगडाची वास्तु नाही तर, परिवर्तन आहे. जसा शिवरायांचा ५० वर्षाचा काळ युगप्रवर्तक होता, ज्याचे परिणाम पुढील १०० ते १५० वर्षे दिसले. त्याचप्रमाणे २०२४ हे वर्ष युगप्रवर्तक असेल. अयोध्येत राम मंदिर झाल्याने संपूर्ण जगाला भारत गुरुस्थानी गेल्याचे बघायला मिळणार आहे. किंबहुना, भारत आता जगाचा मार्गदर्शक बनणार आहे, याचे प्रतिक हे राम मंदिर असल्याचे शेटे यांनी सांगितले.