ठाण्यात होणार भव्य रामायण महोत्सव; देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते होणार तीन दिवसीय रामायण महोत्सवाचे उदघाटन
By अजित मांडके | Published: January 11, 2024 06:56 PM2024-01-11T18:56:10+5:302024-01-11T18:57:17+5:30
गावदेवी मैदानात शनिवार २० जानेवारी ते सोमवार २२ जानेवारी दरम्यान होणाऱ्या रामायण महोत्सवात विविध कार्यक्रम योजले आहेत.
ठाणे : अयोध्या येथे होणाऱ्या श्रीराम मंदिर प्राणप्रतिष्ठा या ऐतिहासिक मंगल सोहळ्याची अनुभूती ठाणेकरांना देण्यासाठी सृजन संपदाच्या माध्यमातून माजी खासदार, आयसीसीआरचे अध्यक्ष, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे उपाध्यक्ष, भाजपचे राष्ट्रीय नेते डॉ. विनय सहस्त्रबुद्धे आणि प्रदेश भाजप प्रवक्ते, रामभाऊ म्हाळगी प्रबोधिनीचे सदस्य सुजय पतकी यांनी तीन दिवसीय भव्य रामायण महोत्सव आयोजित केला आहे.
येथील गावदेवी मैदानात शनिवार २० जानेवारी ते सोमवार २२ जानेवारी दरम्यान होणाऱ्या रामायण महोत्सवात विविध कार्यक्रम योजले आहेत. "मन राम रंगी रंगले" चा आनंद हा रामायण महोत्सव देईल. या अभिनव रामायण महोत्सवाचे उदघाटन राज्याचे उपमुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या हस्ते २० जानेवारी रोजी होणार आहे. "विजयी पताका श्रीरामाची झळकते अंबरी, प्रभू आले मंदिरी" याचा प्रत्यय रामायण महोत्सवातील कार्यक्रम देतील असे सहस्त्रबुद्धे यांनी सांगितले.
श्रीराम जीवन दर्शन घडवणाऱ्या सुबक, सुंदर सत्तावीस रांगोळ्या हे महोत्सवाचे आकर्षण असेल. १५२८ ते २०२४ पर्यंत श्रीराम मंदिर मुक्ती अभियान आणि जन्मस्थानी मंदिर उभारण्याचा निर्धार यातील विविध टप्यावर माहितीपूर्ण चित्र प्रदर्शनी हे या महोत्सवाचे वैशिष्ट्य आहे. कारसेवक हुतात्मा स्तंभ उभारला जाणार आहे. शालेय विद्यार्थ्यांची श्रीराम जीवनातील विविध प्रसगांवर चित्र कला स्पर्धा होणार आहे, अशी माहिती डॉ. विनय सहस्त्रबुद्धे आणि सुजय पतकी यांनी दिली.
२० तारखेला सायंकाळी विद्यावाचस्पती डॉ. शंकर अभ्यंकर यांचे राष्ट्रनिर्माते प्रभू श्रीराम होणार आहे. २१ रोजी सायंकाळी संगीत दिग्दर्शक कमलेश भडकमकर रोजी यांनी रचलेला राम गाईन आवडी गीत संध्या कार्यक्रम होईल. दिनांक बावीस रोजी सायंकाळी ग. दि. माडगूळकर यांनी लिहिलेले आणि सुधीर फडके यांनी संगीतबद्ध केलेले, गायलेले अजरामर गीत रामायण श्रीधर फडके सादर करतील. रोज सायंकाळी सामूहिक रामरक्षा पठण होणार आहे. २२ रोजी अयोध्या येथील सोहळ्याचे थेट प्रक्षेपण केले जाणार आहे.