मुख्यालयाची सुरक्षा रामभरोसे
By admin | Published: January 20, 2016 01:52 AM2016-01-20T01:52:39+5:302016-01-20T01:52:39+5:30
अतिरेक्यांच्या रडारवर ठाणे महापालिका असतानादेखील सोमवारी आयुक्तांच्या दालनाबाहेर झालेल्या आंदोलनानंतर मुख्यालयाच्या सुरक्षा यंत्रणेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे.
ठाणे : अतिरेक्यांच्या रडारवर ठाणे महापालिका असतानादेखील सोमवारी आयुक्तांच्या दालनाबाहेर झालेल्या आंदोलनानंतर मुख्यालयाच्या सुरक्षा यंत्रणेचा प्रश्न पुन्हा एकदा ऐरणीवर आला आहे. सीसीटीव्ही कॅमेरे असताना आणि चारही प्रवेशद्वारांवर चोख सुरक्षा यंत्रणा असतानासुद्धा अशा पद्धतीने आंदोलन झालेच कसे, असा सवाल मात्र यानिमित्ताने उपस्थित झाला आहे. विशेष म्हणजे सोमवारच्या आंदोलनानंतर आयुक्त संजीव जयस्वाल यांनी सुरक्षा अधिकाऱ्यांची चांगलीच झाडाझडती घेतली.
सोमवारी हिंदूसेनेने आंदोलन करून पालिकेच्या सुरक्षा यंत्रणेचे तीनतेरा वाजविले आहेत. अतिरेक्यांच्या रडारवर महापालिका मुख्यालय असतानादेखील अशा प्रकारे पालिकेची सुरक्षा यंत्रणा कुचकामी ठरत असेल तर उद्या मुख्यालयात येणाऱ्यांची सुरक्षा कोण करणार, असा सवालही यानिमित्ताने केला जात आहे. मागील काही वर्षांत महापालिका मुख्यालयात अशा प्रकारे आंदोलने वाढत असून यापूर्वीदेखील महासभेच्या प्रवेशद्वारासमोर मुंब्य्रातील शाळेतील मुलांना हाताशी घेऊन राष्ट्रवादीने आंदोलन केले होते. मनसेनेदेखील आयुक्तांच्या दालनाबाहेर आंदोलन केले होते. मागील दोन वर्षांपूर्वी तर उपायुक्तांच्या दालनातच काही आंदोलनकर्त्यांनी ठिय्या मांडला होता.
दीड वर्षापूर्वी परिवहन समितीच्या निवडणुकीच्या वेळेस झालेल्या राड्यानंतर तत्कालीन आयुक्तांनी मुख्यालयाच्या चारही प्रवेशद्वारांवर चोख बंदोबस्त ठेवला आहे. येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाची कसून चौकशी करण्याचे काम रोज सुरू असते. महापालिका आवारात जे कोणी राडा करण्याचा प्रयत्न करतील, त्यांच्यावर सीसीटीव्हीचाही वॉच ठेवण्यात येत आहे. नऊ प्रभाग समित्यांमधून अतिरिक्त सुरक्षारक्षकांची टीम महापालिका मुख्यालयाच्या चारही प्रवेशद्वारांवर तैनात केली असून २० सुरक्षारक्षक चारही प्रवेशद्वारांवर बंदोबस्तासाठी ठेवले आहेत. यामध्ये आठ महिला सुरक्षारक्षकांचाही समावेश आहे. विशेष म्हणजे मेटल डिटेक्टरच्या आत असलेला चौकशी टेबल आता बाहेर ठेवला असून येणाऱ्या-जाणाऱ्या प्रत्येकाची बॅग, त्यांनी आणलेले साहित्य यांची कसून तपासणी केली जात आहे. त्यातही मुख्य प्रवेशद्वार हे अर्धेच उघडे ठेवले असून आत प्रवेश करणाऱ्यांचीही कसून चौकशी केली जात होती. परंतु, ही चौकशी आंदोलनानंतर काही दिवसच होत होती.