रामदास आठवलेंनी पप्पू कलानीची भेट टाळली; चर्चांना उधान
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: October 5, 2021 07:03 PM2021-10-05T19:03:52+5:302021-10-05T19:29:32+5:30
रिपाइंचे प्रमुख व केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांची भाजप सोबत आघाडी असून ते स्वतः केंद्रात मंत्री आहेत. स्थानिक पातळीवर भाजप पक्षा सोबतचे राजकीय संबंध ओमी कलानी टीमने तोडून शिवसेनेशी जवळीकता साधली आहे.
- सदानंद नाईक
उल्हासनगर : रिपाइंचे माजी आमदार पप्पू कलानी यांची केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांनी भेट टाळल्याने, शहरात विविध चर्चेला ऊत आला. पेरॉलवर जेल बाहेर आलेल्या पप्पु कलानी यांनी सर्वपक्षाच्या नेत्यांच्या भेटीगाठी सुरू ठेवून शहरातील वातावरण कलानीमय केले.
उल्हासनगरातील रिजेन्सी अंटेलिया येथील सभागृहात रिपब्लिकन पक्षाचा ६४ वा वर्धापनदीनाचा कार्यक्रम रविवारी पार पडला. पक्ष प्रमुख व केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांच्यासह पक्षाचे नेते तसेच मित्रपक्ष असलेल्या भाजपचे केंद्रीयमंत्री कपिल पाटील, आमदार कुमार आयलानी, गणपत गायकवाड, भाजपचे शहरजिल्हाध्यक्ष जमनुदास पुरस्वानी, नगरसेवक राजेश वधारीया, महेश सुखरामनी, रिपाईचे जिल्हाध्यक्ष व उपमहापौर भगवान भालेराव आदी जण कार्यक्रम माला उपस्थित होते. पक्षाचा वर्धापनदीनाचा कार्यक्रम संपन्न झाल्यावर, पक्षप्रमुख रामदास आठवले हे कलानी महल येथे पक्षाचे माजी आमदार पप्पू कलानी यांना भेटायला येणार असल्याने, कलानी महल कार्यकर्त्यांनी गजबजून गेले होते. मात्र ऐनवेळी आठवले यांनी कलानी यांची टाळल्याने, विविध चर्चेला ऊत आला आहे.
एकेकाळी विधानसभा निवडणुकीत पप्पू कलानी यांना कोणताही पक्ष उमेदवारी देत नोव्हता. अशावेळी रामदास आठवले यांनी रिपाइंचे तिकीट देऊन, सर्वांना आश्चर्यचकीत केले. त्यावेळी कलानी रिपाईचे आमदार तर त्यांच्या धर्मपत्नी ज्योती कलानी राष्ट्रवादी पक्ष्याच्या शहरजिल्हाध्यक्ष होत्या. एकाच घरात दोन पक्ष कार्यरत होते. पप्पू कलानी व रामदास आठवले यांच्या मधील संबंध चांगले असल्ल्यानेच, आठवले व कलानी यांची कलानी महल मध्ये भेट ठरली होती. तसेच कलानी महलवर कलानी यांचे जुने-नवे सहकारी, समर्थक, रिपाइंचे पदाधिकारी आदीजन आठवले यांची भेट घेण्यासाठी एकत्र आले होते. मात्र ऐनवेळी आठवले यांनी वैयक्तिक कारण देत भेट टाळल्याने तर्कवितर्कला ऊत आला आहे.
कलानी समर्थकांचा झाला हिरमोड
रिपाइंचे प्रमुख व केंद्रीयमंत्री रामदास आठवले यांची भाजप सोबत आघाडी असून ते स्वतः केंद्रात मंत्री आहेत. स्थानिक पातळीवर भाजप पक्षा सोबतचे राजकीय संबंध ओमी कलानी टीमने तोडून शिवसेनेसी जवळीकता साधली आहे. पप्पु कलानी यांना भेटून काय चर्चा करावी, असे पक्षाच्या स्थानिक पदाधिकाऱ्यांनी आठवले यांना सांगितल्यानेच, आठवले यांनी कलानी यांची भेट टाळली असावी. अशी चर्चा शहरात रंगली आहे. आठवले व कलानी यांची भेट न झाल्याने, कलानी समर्थकांचा मात्र हिरमोड झाल्याचे बोलले जात आहे.