...अन् आठवलेंचा दौरा शेवटच्या क्षणी रद्द!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 13, 2019 12:41 AM2019-10-13T00:41:23+5:302019-10-13T00:42:17+5:30
कार्यकर्त्यांचा हिरमोड । लँडिंग नाकारले
कल्याण : रिपब्लिकन पक्षाचे नेते व केंद्रीय मंत्री रामदास आठवले हे शनिवारी कल्याणला महायुतीच्या प्रचारासाठी येणार होते. परंतु, हेलिकॉप्टर उतरवायला परवानगी न मिळाल्याने त्यांचा दौरा शेवटच्या क्षणी रद्द करावा लागला. यामुळे कार्यकर्त्यांचा हिरमोड झाला. आता १५ किंवा १६ आॅक्टोबरनंतर ते कल्याण दौऱ्यावर येतील, असे स्थानिक पदाधिकाऱ्यांकडून सांगण्यात आले.
मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी महायुतीच्या उमेदवारांच्या प्रचारार्थ शुक्रवारी उल्हासनगर आणि ठाण्यात सभा घेतल्या. या सभांना आठवले उपस्थित राहतील, अशी शक्यता होती. परंतु, ते उपस्थित राहिले नाहीत.
आठवले शनिवारी सकाळी मनमाडला हेलिकॉप्टरने प्रचारासाठी जाणार होते. त्यापूर्वी सकाळी ११.३० वाजता त्यांनी कल्याण पूर्व व पश्चिममधील महायुतीच्या प्रचारासाठी कल्याणचा दौरा ठरविला होता. आठवले यांचे हेलिकॉप्टर भिवंडीनजीकच्या बापगाव येथे उतरविण्यात येणार होते. मात्र, हा दौरा ऐनवेळी ठरला. त्यात हेलिकॉप्टर उतरविण्यासाठीही आगाऊ परवानगी घेण्यात आली नव्हती. शुक्रवारी रात्री उशिरापर्यंत ठाणे जिल्हाधिकारी कार्यालयात परवानगीसाठी अर्ज तसेच फोनाफोनीही झाली. परंतु, ऐनवेळी दौरा ठरल्याने हेलिपॅडचे नियोजन कसे करायचे, असा प्रश्न उभा राहिल्याने जिल्हाधिकारी कार्यालयाकडून परवानगी दिली गेली नसल्याची माहिती मिळत आहे.
यासंदर्भात रिपाइंचे स्थानिक ज्येष्ठ नेते अण्णा रोकडे यांच्याशी ‘लोकमत’ने संपर्क साधला असता त्यांनी हेलिकॉप्टर उतरवायला परवानगी न मिळाल्याने आठवले यांचा दौरा रद्द केल्याची माहिती दिली.
रॅली रद्द झाली
खडकपाडा पोलीस ठाण्यातील गोपनीय विभागाशी संपर्क साधला असता त्यांनी आठवले यांची गांधारी ते खडकपाडा, अशी रॅली महायुतीच्या उमेदवाराच्या प्रचारार्थ आयोजित करण्यात आली होती. परंतु, ते न आल्याने रॅली रद्द करण्यात आली. पण, त्यांच्या हेलिकॉप्टरच्या परवानगीसंदर्भात आमच्या विभागाकडे माहिती नाही, असे त्यांनी सांगितले.