रामदास भटकळ यांचा उद्या ठाण्यात होणार गौरव; लोकप्रिय गीतकार स्वानंद किरकिरे यांचाही होणार सन्मान
By ऑनलाइन लोकमत | Published: February 26, 2024 11:57 AM2024-02-26T11:57:13+5:302024-02-26T11:57:23+5:30
राष्ट्रीय पुरस्कार विजेते गीतकार स्वानंद किरकिरे यांच्याशी अपर्णा पाडगावकर या संवाद साधणार आहेत.
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : अनेक प्रथितयश लेखकांचे ग्रंथ प्रकाशित करून त्यांना प्रकाशात आणणारे व मराठी सारस्वतामध्ये आपल्या अखंड ग्रंथनिर्मितीने मोलाचे योगदान देणारे ग्रंथतपस्वी रामदास भटकळ यांना येत्या मंगळवारी सायंकाळी साडेपाच वाजता येथील गडकरी रंगायतनमध्ये आयोजित सोहळ्यात जीवनगौरव पुरस्काराने सन्मानित केले जाणार आहे. यावेळी ज्येष्ठ लेखक श्याम मनोहर हे प्रमुख अतिथी म्हणून तर लोकमत एडिटोरियल बोर्डाचे चेअरमन डॉ. विजय दर्डा अध्यक्षस्थानी उपस्थित राहणार आहेत. याचवेळी राष्ट्रीय पुरस्कार विजेते गीतकार स्वानंद किरकिरे यांच्याशी अपर्णा पाडगावकर या संवाद साधणार आहेत.
कुसुमाग्रज, जी. ए. कुलकर्णी, कवी ग्रेस, विंदा करंदीकर, भालचंद्र नेमाडे अशा दिग्गजांचे ग्रंथ प्रकाशित करून प्रकाशन व्यवसायात शतकी कामगिरी केलेले पॉप्युलर प्रकाशन संस्थेचे प्रकाशक व लेखक रामदास भटकळ यांनी प्रकाशन व्यवसायात आपल्या देदीप्यमान कामगिरीने नवे मापदंड निर्माण केले आहेत.
प्रख्यात सुलेखनकार अच्युत पालव 'अक्षर संवाद' या उपक्रमाच्या माध्यमातून उपस्थित रसिकांना प्रात्यक्षिक करून दाखवतील. पुस्तकाच्या कव्हरचे महत्त्व असते तरी काय हेदेखील उपस्थितांना दाखवून देतील. अभिनेते किशोर कदम, साहित्य पुरस्कारांचे परीक्षक लेखिका अरुणा ढेरे, अभिनेते वैभव मांगले, कवयित्री नीरजा, समीक्षक सुहास किर्लोस्कर, लेखिका वंदना अत्रे, लेखक व अभिनेता अक्षय शिपी हेही उपस्थित राहणार आहेत.
लोकमत कार्यालयात प्रवेशिका उपलब्ध
ठाण्यातील गडकरी रंगायतन येथे २७ फेब्रुवारी रोजी सायंकाळी साडेपाच वाजता होणाऱ्या साहित्य पुरस्कार वितरण सोहळ्याच्या मोफत प्रवेशिका लोकमतच्या ठाणे कार्यालयात उपलब्ध होणार आहेत. साहित्य रसिकांनी सकाळी १० ते रात्री १० या वेळेत तेथून त्या घेऊन जाव्यात.
इच्छुकांनी खालील पत्त्यावर संपर्क साधावा : लोकमत ठाणे कार्यालय, वेस्ट व्ह्य, पहिला मजला, राम मारोती रोड, वारकरी भवन शेजारी, गजानन महाराज मंदिर चौक, ठाणे (प.). पॉप्युलरच्या शंभर वर्षांच्या कामगिरीचा आढावा घेतला जाणार आहे. भटकळ यांच्याशी संवाद साधला जाणार आहे.