रामदास खरात यांनी पटकावला मास्टर्स स्ट्रॉंग मॅन ऑफ इंडियाचा किताब
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: November 23, 2019 12:03 AM2019-11-23T00:03:37+5:302019-11-23T00:03:40+5:30
ठाणे ग्रामीण पोलिसांचे यश; राष्ट्रीय स्पर्धेत पोलीस व्यायामशाळेच्या चौघांना सुवर्णपदक
ठाणे : नागपूर, वाशीम येथे १३ ते १७ नोव्हेंबरदरम्यान झालेल्या राष्ट्रीय ज्युनिअर व मास्टर्स स्पर्धेत ठाणे ग्रामीण पोलीस व्यायामशाळेच्या खेळाडूंनी घवघवीत यश संपादन केले आहे. यामध्ये चार जणांनी सुवर्णपदक जिंकले. या व्यायामशाळेचे प्रशिक्षक आणि सहायक पोलीस उपनिरीक्षक रामदास खरात यांनी मास्टर्स स्ट्रॉंग मॅन ऑफ इंडिया २०१९ चा किताब पटकावला असून राष्ट्रीय स्तरावर त्यांनी चौथ्यांदा अशी कामगिरी केली आहे.
भारतीय पॉवरलिफ्टिंग फेडरेशनच्या मान्यतेने राष्ट्रीय ज्युनिअर व मास्टर्स स्पर्धेचे आयोजन केले होते. या स्पर्धेमध्ये देशभरातून १९ राज्यांतून २४३ खेळाडूंनी सहभाग नोंदवला होता. या स्पर्धेत ठाणे ग्रामीण पोलीस व्यायामशाळेचे पोलीस हवालदार गोपाळ बरखडे, दत्तात्रेय कटकधोंड, महेश बासूतकर, रवींद्र चव्हाण तसेच व्यायामशाळेचे प्रशिक्षक सहायक पोलीस उपनिरीक्षक रामदास खरात यांनी सुवर्णपदक पटकावले आहे. या स्पर्धामध्ये रामदास खरात यांनी ९७ किलो वजनी गटात ७०० किलो वजन उचलून मास्टर्स स्ट्रॉंग मॅन ऑफ इंडिया २०१९ चा किताब पटकावला आहे. खरात यांनी आजपर्यंत दोनदा शिवछत्रपती राज्य क्रीडा पुरस्कार, गुणवंत क्रीडा मार्गदर्शक पुरस्कार, गुणवंत खेळाडू पुरस्कार असे शासनाचे पुरस्कार प्राप्त केले असून त्यांना महाराष्ट्रीच्या पोलीसपदकानेदेखील सन्मानित केले आहे. २४ ते २७ डिसेंबरदरम्यान जमशेदपूर येथे होणाऱ्या आंतरराष्ट्रीय स्पर्धेकरिता खरात यांची निवड झाली.