सुभाष भोईर यांच्या उमेदवारीला कल्याण ग्रामीणमध्ये विरोध, रमेश म्हात्रे समर्थक आक्रमक

By ऑनलाइन लोकमत | Published: October 3, 2019 02:05 AM2019-10-03T02:05:54+5:302019-10-03T02:06:17+5:30

विद्यमान आमदार सुभाष भोईर यांची उमेदवारी लादली, तर त्यांना पराभूत करू, असा बंडाचा इशारा शिवसेनेचे कल्याण ग्रामीणचे तालुकाप्रमुख एकनाथ पाटील यांनी दिला आहे.

Ramesh Mhatre's supporters aggressive against Subhash Bhoir | सुभाष भोईर यांच्या उमेदवारीला कल्याण ग्रामीणमध्ये विरोध, रमेश म्हात्रे समर्थक आक्रमक

सुभाष भोईर यांच्या उमेदवारीला कल्याण ग्रामीणमध्ये विरोध, रमेश म्हात्रे समर्थक आक्रमक

googlenewsNext

कल्याण : कल्याण ग्रामीण विधानसभा मतदारसंघातून शिवसेनेचे नगरसेवक रमेश म्हात्रे यांना उमेदवारी दिली नाही आणि विद्यमान आमदार सुभाष भोईर यांची उमेदवारी लादली, तर त्यांना पराभूत करू, असा बंडाचा इशारा शिवसेनेचे कल्याण ग्रामीणचे तालुकाप्रमुख एकनाथ पाटील यांनी दिला आहे.
आ. भोईर यांच्याविरोधातील शिवसैनिक पदाधिकारी व रमेश म्हात्रे यांचे समर्थक यांनी बुधवारी सायंकाळी घारिवलीनजीक पत्रकार परिषद घेऊन बंडाचा झेंडा रोवला. यावेळी उपस्थित शेकडो शिवसैनिकांनी भोईर यांच्याविरोधात घोषणा दिल्या. पाटील म्हणाले की, कल्याण ग्रामीणमधील ४०० शिवसैनिक येथे उपस्थित असून शिवसैनिकांमध्ये भोईर यांच्या कार्यपद्धतीविषयी नाराजी आहे. भोईर यांनी आमदार या नात्याने कल्याण ग्रामीणमध्ये विकासकामे केलेली नाहीत. तसेच कार्यकर्त्यांना दुखावले आहे. मतदारसंघात वाहतूककोंडी, खराब रस्ते, पाणीटंचाई आदी समस्या आहेत. या समस्या सोडवण्यात आमदार अपयशी ठरले आहेत. भोईर यांच्याविरोधात पक्षाच्या नाराज पदाधिकाऱ्यांनी पालकमंत्री एकनाथ शिंदे यांच्याकडे तक्रारी केल्या होत्या. पक्षातील नाराज गटाने आता रमेश म्हात्रे यांनाच उमेदवारी द्यावी, अशी मागणी केली आहे. पक्षाने म्हात्रे यांना उमेदवारी दिली नाही, तर शिवसैनिक भोईर यांचे काम करणार नाहीत. त्यांचा निवडणुकीत पराभव करणार. तसेच ४०० पदाधिकारी व शिवसैनिक त्यांच्या पदांचे राजीनामे देणार असल्याचे पाटील यांनी जाहीर केले.
शिवसेनेने भोईर यांना ‘ए व बी’ फॉर्म ३० सप्टेंबर रोजी दिला. भोईर यांनी १ आॅक्टोबर रोजी कुठलीही मिरवणूक न काढता उमेदवारी अर्ज भरला आहे. भोईर यांनी उमेदवारी अर्ज भरला असला, तरी पक्षश्रेष्ठींनी त्याचा फेरविचार करावा, अशी मागणी त्यांनी केली. उमेदवारी अर्ज भरण्याची अंतिम तारीख ४ आॅक्टोबर आहे. उद्यापर्यंत पक्षाकडून भोईरांच्या फेरविचार केला जाणे अपेक्षित आहे. रमेश म्हात्रे यांना मागच्या २०१४ सालच्या निवडणुकीतही उमेदवारीचे आश्वासन दिले होते. आता भोईर यांच्याविरोधात शिवसैनिकांमध्ये नाराजी असताना भोईर यांना उमेदवारी देऊन पुन्हा म्हात्रे यांच्यावर अन्याय केला आहे. हा अन्याय ग्रामीण मतदारसंघातील शिवसैनिक सहन करणार नाही. आ. भोईर यांच्याविरोधात शिवसैनिकांचा असहकार राहणार आहे, असे पाटील म्हणाले.

‘ठाकरेंची सेना भोईरांना कळलीच नाही’

वाकळण गावात पालकमंत्री शिंदे व खा. श्रीकांत शिंदे यांनी केलेल्या विकासकामांचे श्रेय भोईर घेत आहेत. भोईर यांना ठाकरेंची शिवसेना कळलेलीच नाही. त्यामुळे त्यांच्याविरोधात शिवसैनिकांचा आक्रोश उफाळून आला असल्याचा आरोप वाकळणचे सरपंच अनिल भोईर यांनी यावेळी केला.

कल्याण ग्रामीण मतदारसंघात येणा-या नवी मुंबईच्या १४ गावांतील पाण्याचा प्रश्न सोडवलेला नाही. त्यामुळे आमची त्यांच्याविरोधात नाराजी असल्याने पक्षाने उमेदवार बदलून द्यावा. त्यांच्याऐवजी म्हात्रे यांना उमेदवारी द्यावी, या मागणीवर आम्ही ठाम राहणार आहोत, असे भोईर म्हणाले.

सुभाष भोईर यांना काही दिवसांपूर्वी उद्धव ठाकरे यांनी एबी फॉर्म दिला होता, त्यानंतर भोईर यांनी गाजावाजा न करता उमेदवारी अर्ज सादरही केला. त्यामुळे शिवसैनिकांमध्ये मोठी नाराजी आहे. भोईर हे मागील निवडणुकीपूर्वी राष्ट्रवादीतून शिवसेनेत आले. तसेच त्यांनी ठाणे महापालिका आणि केडीएमसी निवडणुकीत पक्षाच्याच उमेदवारांना पाडण्याचा प्रयत्न केला. त्यामुळे अशा लोकांना उमेदवारी देणार असाल, तर आम्ही काम करणार नाही. - रमाकांत मढवी, उपमहापौर, ठाणे
 

Web Title: Ramesh Mhatre's supporters aggressive against Subhash Bhoir

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.