‘रामलीला’ चणिया चोलीला मागणी कायम
By admin | Published: October 14, 2015 02:40 AM2015-10-14T02:40:03+5:302015-10-14T02:40:03+5:30
‘रामलीला’ चित्रपटातील ‘ढोल बाजे’ या गाण्यात दीपिकाने घातलेली चणिया चोली ही रामलीला चनिया चोली नावाने प्रसिद्ध झाली. या चित्रपटाला दोन वर्ष उलटून गेले तरी बाजारात या चोलीला मागणी कायम आहे
जान्हवी मोर्ये, ठाणे
‘रामलीला’ चित्रपटातील ‘ढोल बाजे’ या गाण्यात दीपिकाने घातलेली चणिया चोली ही रामलीला चनिया चोली नावाने प्रसिद्ध झाली. या चित्रपटाला दोन वर्ष उलटून गेले तरी बाजारात या चोलीला मागणी कायम आहे. कारण चित्रपटातील पेहरावाची भुरळ आजही शहरी तरूण पिढीवर कायम आहे. यंदा ही बाजारात तरूणींकडून गरबा व दांडिया नृत्यासाठी या चोलीच खरेदी केली जात आहे.
या चोलीला घेर जास्त आहे. गुजराती व राजस्थानी चणिया चोलीचा मिलाफ या चणिया चोलीत पाहायला मिळतो. बाजारात गरबा व दांडिया नृत्य खेळण्यासाठी लागणारे नवीन पॅटर्नचे ड्रेस बरेच आले आहेत. ड्रेस घेण्याकडे मुलींच्या तुलनेत मुलांचा कल कमी आहे. शाळांमध्ये नवरात्री सेलिब्रेशन होत असल्याने लहान मुलांमध्ये ड्रेस खरेदी जास्त प्रमाणात केली जाते. मुलींसाठी ५०० ते अडीच किंवा तीन हजार रूपयांपर्यंत ड्रेस बाजारात उपलब्ध आहेत. मुलांमध्ये १२५ ते ९०० रूपये दराचे ड्रेस बाजारात आहेत. सलमान खान जॅकेट व लगान चित्रपटात आमीर खान याने घातलेल्या केडिया जॅकेटला बाजारात जास्त मागणी आहे. तरूणांसाठी काठीयावाडी जॅकेट व डोक्याला गुजराथी स्टाईलचा फेटा अशा पारंपारिक पद्धतीचा पेहराव उपलब्ध आहे. नवरात्री ड्रेसमध्ये साधी कारागिरी व कॉम्प्युटरवर तयार केलेल्या डिझाईनमध्येही ड्रेस मिळतात. चणिया चोलीवर बांधणी प्रिंट, अबला वर्कचे, कशिदा कलाकुसरीचे भरगच्च भरतकाम केलेले आहे. गरबा खेळताना बॅकलेस चोलीची फॅशन जोरात आहे. त्यांच्या नाड्या खूप चांगल्याप्रकारे सजविलेल्या असतात. याशिवाय स्लिव्ह्जलेस, डीप यू नेक व त्यावर केलेले वर्क अशा चोली बाजारात आहेत. तर घागऱ्यांमध्ये बांधणी, राजस्थानी, लेहरिया प्रिंटचा वापर केला जातो. तसेच घागऱ्यांना कवड्या, कच्छी वर्क, आरसे, मोती लावून सजवलेले जाते. चनिया चोलीबरोबर नव्या पद्धतीचे जॅकेट्स ही बाजारात आले आहेत. त्यावर खास गुजराथी काठीयावाडी स्टाईलच्या कवड्या, काचा लावलेली कलाकुसर पाहायला मिळते. मुलांची हौस म्हणून आई-वडिलड्रेस खरेदी करतात. उत्सवाच्या डोंबिवली नगरीत नवरात्रीला दक्षिण भारतीय व मराठी लोकांसह गुजराती लोकांचा कल ड्रेस खरेदी करण्याकडे जास्त आहे, अशी माहिती विक्रेत्या धीरजबेन ठक्कर यांनी दिली आहे. ड्रेसला शोभेसे आॅक्साइड दागिने बाजारात मिळतात. त्याचीही लगेच खरेदी होते. यात कानातले, गळ््यातले, यासोबत निआॅन कड्यांची रंगसंगती खूप खुलून दिसते. मोती, खडे, कुंदन लावलेल्या दोन कड्यांची जोडी, कपाळावर बिंदी व जाडे पैंजण तसेच चनिया चोळीवर मॅचिग असे कंबरपट्टे देखील आहेत. त्यातही मोती आणि मेटलबरोबरच वेलवेटचे गोल लावलेले किंवा चौकानी मेटलचे कंबरपट्टे देखील बाजारात दिसतात.
अनेक आजी-आजोबा त्यांच्या परदेशातील नातवडांसाठी ड्रेस खरेदी करण्यापूर्वी बाजारात जातात. ड्रेसचा फोटो काढून व्हॉटस् अपवर परदेशी पाठवितात. नातवाच्या आई बाबांकडून होकार आला की ड्रेस खरेदी करून तो परदेशात पाठविला जातो. ही तयारी नवरात्रीच्या आठ दिवसापूर्वी सुरू होते.
भाड्याच्या ड्रेसला संसर्गजन्य आजारांचा ब्रेक
नवरात्री उत्सवाकरिता भाडयाने ड्रेस घेण्याकडे जास्त कल होता. एका दिवसाला दीडशे रूपये भाडे आकाराले जात होते. शहरात भाड्यावर कपडे देणारे अनेक ड्रेसवाले आहेत. मात्र सध्या संसर्गजन्य आजाराला भीऊन आरोग्याची काळजी घेण्यासाठी भाड्याचा ड्रेस घेणे टाळले जाते. त्यापेक्षा साध्या ड्रेसवर अथवा विकत खरेदी केलेल्या नव्या ड्रेसवर गरबा व दांडिया खेळण्यास पसंती दिली जात आहे.