युतीसाठीच रामनामाचा जप
By ऑनलाइन लोकमत | Published: December 3, 2018 12:54 AM2018-12-03T00:54:48+5:302018-12-03T00:54:59+5:30
साडेचार वर्षे सत्तेत राहून भाजपाचे वाभाडे काढण्यात आले.
डोंबिवली : साडेचार वर्षे सत्तेत राहून भाजपाचे वाभाडे काढण्यात आले. पण, लोकसभा निवडणूक जवळ येताच युती करण्यासाठी काहीतरी कारण असावे, म्हणूनच शिवसेनेने अयोध्या दौरा करून रामनामाचा जप आळवला. हिंदुत्वावर आम्ही एकत्र आलो आहोत, हे त्यांना दाखवायचे आहे. झोपलेल्या कुंभकर्णाला मी जागे करायला आलो आहे, असे शिवसेना पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी याप्रसंगी सांगितले. मग, साडेचार वर्षे तुम्ही झोपले होते का, असे विचारत राष्ट्रवादीचे नेते गणेश नाईक यांनी ठाकरे यांच्यावर टीका केली.
राष्ट्रवादी कल्याण-डोंबिवली शहर जिल्हातर्फे शनिवारी डोंबिवली गोळवली-दावडीमध्ये पक्ष संघटना व बुथ सभा झाली. यावेळी
केंद्र सरकारवर टीका करताना नाईक म्हणाले की, मोदी सरकार हे फेकू सरकार आहे. सत्तेत येण्यापूर्वीची त्यांनी त्यांची भाषणे तपासून पाहावीत. खात्यात १५ लाख सोडा, १५ रु पये तरी आले का, महागाई कमी झाली का, इंधनदरवाढ कमी झाली का, मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांनी आजपर्यंत ६५०० कोटी रु पये दिले का? याचाही विचार सर्वसामान्यांनी करायला हवा. सामाजिक प्रश्नांना वाचा फोडण्यासाठी राष्ट्रवादी आगामी काळात राज्यात मोठी आघाडी घेईल.
पक्षातील कार्यकर्त्यांनी आपापसांतील हेवेदावे कमी करून मजबूत पक्षबांधणी करून पक्षाला बळकटी देण्याच्या दृष्टीने काम करावे. त्यातूनच आपण महापालिका, विधानसभा, लोकसभा या निवडणुकीत यश मिळवू, असा विश्वास नाईक यांनी व्यक्त केला. यावेळी प्रदेश प्रवक्तेमहेश तपासे, माजी खासदार संजीव नाईक यांच्यासह प्रमोद हिंदुराव, डॉ. वंडार पाटील आदी उपस्थित होते.
>महिला राष्ट्रवादीकडून मनुस्मृती, ईव्हीएम जाळण्याचा प्रयत्न
कल्याण : ‘ईव्हीएम हटाव, लोकशाही बचाव’ अशा घोषणा देत प्रतीकात्मक ईव्हीएम मशीन आणि मनुस्मृती जाळण्याचा प्रयत्न राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला पदाधिकाऱ्यांनी रविवारी पश्चिमेतील सहजानंद चौक परिसरात केला. मात्र, त्यांचा हा प्रयत्न पोलिसांनी हाणून पाडल्याने त्यांनी ईव्हीएम मशीन आणि मनुस्मृती फाडली. यावेळी महिला कार्यकर्त्या आणि पोलिसांमध्ये झटापटदेखील झाली.राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या महिला आघाडीद्वारे ‘संविधान बचाव, देश बचाव’ हा व्यापक कार्यक्रम राज्यात राबवला जात आहे. याच महत्त्वाकांक्षी कार्यक्रमाच्या पूर्वनियोजनाबाबत कोकण विभागातील सर्व जिल्ह्यांत बैठका आयोजित केल्या आहेत. या मुख्य कार्यक्रमाच्या तयारीच्या अनुषंगाने कल्याण जिल्ह्यात राष्ट्रीय अध्यक्षा फौजिया खान, विद्या चव्हाण यांनी उपस्थित महिलांना मार्गदर्शन केले. यावेळी प्रदेश प्रवक्ते महेश तपासे, आ. ज्योती कलानी, जिल्हाध्यक्ष रमेश हनुमंते, माजी नगरसेवक जे.सी. कटारिया, माया कटारिया तसेच इतर पदाधिकारी उपस्थित होते.यावेळी, फौजिया खान म्हणाल्या की, मशीनमध्ये घोटाळे होत असल्याचे वारंवार समोर आले आहे. त्यामुळे या पुढील काळात ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवर मतदान घेण्यात यावे. ईव्हीएममध्ये छेडछाड होत असल्याची शंका नागरिकांना आहे. ईव्हीएमचा शोध ज्या देशाने लावला, तेथेही आता ईव्हीएमवर मतदान घेतले जात नाही. जगातील अनेक प्रगत देशांमध्येदेखील ईव्हीएमऐवजी बॅलेट पेपरवरच मतदान घेतले जाते. त्यामुळे बॅलेट पेपरवरच मतदान घेण्यात यावे, अशी आमची मागणी आहे.