रामनाथ सोनवणे ‘उपायुक्त’पदावरून निवृत्त

By admin | Published: July 1, 2017 07:27 AM2017-07-01T07:27:58+5:302017-07-01T07:27:58+5:30

केडीएमसीचे माजी आयुक्त व नागपूर महापालिकेचे विद्यमान अतिरिक्त आयुक्त रामनाथ सोनवणे आणि केडीएमसीचे

Ramnath Sonawane retired as Deputy Commissioner | रामनाथ सोनवणे ‘उपायुक्त’पदावरून निवृत्त

रामनाथ सोनवणे ‘उपायुक्त’पदावरून निवृत्त

Next

लोकमत न्यूज नेटवर्क
कल्याण : केडीएमसीचे माजी आयुक्त व नागपूर महापालिकेचे विद्यमान अतिरिक्त आयुक्त रामनाथ सोनवणे आणि केडीएमसीचे माजी सचिव सुभाष भुजबळ हे वयोमानानुसार शुक्रवारी निवृत्त झाले. भुजबळ यांनी स्वेच्छानिवृत्ती घेतली होती. त्यांच्या मान्यतेचा प्रस्ताव महासभेत प्रलंबित आहे. परंतु, आता ते वयोमानानुसार निवृत्त झाले. तर सरकारकडील प्रतिनियुक्तीवरील अधिकारी असलेले सोनवणे हे केडीएमसीच्या आस्थापनासूचीवरील अधिकारी असल्याने त्यांना येथील त्यांच्या ‘उपायुक्त’ या मूळ पदावर निवृत्ती घ्यावी लागली आहे.
सोनवणे यांनी दोनवेळा केडीएमसीचे आयुक्तपद भूषवले. यानंतर त्यांची बदली नागपूर महापालिकेचे अतिरिक्त आयुक्तपदी झाली होती. सरकारने सोनवणे यांना प्रतिनियुक्तीवर अन्य महापालिकांमध्ये पाठवले असले तरी त्यांची मूळ सेवा ही केडीएमसीमधील असल्याने नागपूर महापालिकेच्या अतिरिक्त आयुक्तांना याठिकाणी उपायुक्त म्हणून निवृत्त व्हावे लागले आहे. आता त्यांना निवृत्तीवेतन देताना कोणते निकष लावले जातात? आणि सरकार याबाबत कोणता निर्णय घेते? याबाबत संभ्रमावस्था कायम आहे.
दुसरीकडे महासभेला अंधारात ठेवून स्वेच्छानिवृत्ती घेणारे पालिकेचे माजी सचिव भुजबळ हे देखील शुक्रवारी निवृत्त झाले. सचिवपदाचा प्रभारी कार्यभार सांभाळणारे सहायक आयुक्त भुजबळ यांना निवृत्त होण्यास ७ महिने शिल्लक असताना त्यांनी प्रशासनाकडे स्वेच्छानिवृत्तीचा अर्ज भरला होता. त्याला तत्कालीन आयुक्त ई. रवींद्रन यांनी ३० नोव्हेंबरला मान्यता दिली. मात्र, भुजबळ हे वर्ग २ चे अधिकारी असल्याने प्रशासनाने निर्णय घेण्यापूर्वी स्वेच्छानिवृत्तीचा प्रस्ताव स्थायी समिती तसेच महासभेकडे मंजुरीसाठी पाठवणे अपेक्षित होते आणि त्यांच्या मान्यतेनुसार निर्णय घ्यायला हवा होता. परंतु, तशी कोणतीही कृती न करता परस्पर भुजबळांना स्वेच्छानिवृत्ती देण्यात आली होती.
महासभा आणि स्थायी समितीला याबाबतची कोणतीही कल्पना देण्यात आली नव्हती. महासभेने मंजुरी दिल्यानंतर त्यांना निवृत्ती द्यायला हवी होती, परंतु प्रशासनाने तो निर्णय परस्पर घेतल्याने हे महासभेच्या अधिकारावर अतिक्रमण आहे, असा आरोप सर्वपक्षीय सदस्यांनी केले होते.

Web Title: Ramnath Sonawane retired as Deputy Commissioner

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.