योग्य उपचाराने रामपाल बचावले
By admin | Published: July 8, 2017 05:36 AM2017-07-08T05:36:09+5:302017-07-08T05:36:09+5:30
आधीच वयोवृद्ध, त्यातच ब्रेन हॅमरेज झालेल्या उत्तरप्रदेशातील ५० वर्षीय रामपाल अकबल यांना अनोळखी म्हणून दाखल केल्यानंतर
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : आधीच वयोवृद्ध, त्यातच ब्रेन हॅमरेज झालेल्या उत्तरप्रदेशातील ५० वर्षीय रामपाल अकबल यांना अनोळखी म्हणून दाखल केल्यानंतर ठाणे जिल्हा शासकीय रुग्णालयातील डॉक्टरांनी दाखवलेल्या तत्परतेने उपचार करून त्यांना जीवदान मिळाले आहे. तसेच त्यांच्या नातेवाईकांचा शोध घेतल्याने ते आता स्वगृही परतले आहेत.
कल्याण परिसरात काही लोकांनी ४ जून रोजी ठाणे जिल्हा सामान्य रुग्णालयात त्यांना बेशुद्ध अवस्थेत अनोळखी म्हणून उपचारार्थ दाखल केले. त्या वेळेस त्यांची परिस्थिती अंत्यत नाजूक होती. त्यातच ते अनोळखी असतानाही, जिल्हा शल्यचिकित्सक डॉ.बी.सी केम्पीपाटील आणि अतिरिक्त जिल्हा शल्य चिकित्सक डॉ. संगीता माकोडे यांच्या मार्गदर्शनाखाली फिजीशीयन डॉ. श्रीजीत शिंदे, डॉ. मुळीक यांनी कोणताही विलंब न करता, तातडीने उपचार सुरू केले. उपचार सुरू असताना, त्यांचे ब्रेन हॅमरेज झाल्याचे पुढे आले. तरीसुद्धा डॉक्टरांनी प्रयत्न सुरुच ठेवल्याने त्यांच्या प्रकृतीत हळूहळू सुधारणा होऊ लागली. तसेच ते अखेर शुद्धीवर आले. याचदरम्यान, त्यांच्याकडे रुग्णालयाचे समाजसेवा अधीक्षक धनंजय पारखे आणि श्रीरंग सिद यांनी विचारपूस केली. त्यावेळी त्यांनी उत्तरप्रदेशातील रहिवाशी असल्याचे सांगितले. त्यांनी दिलेल्या माहितीनुसार, त्यांच्या घरच्यांशी संपर्क साधून नातेवाईकांचा शोध घेऊन त्यांची भेट घडवून आणली आहे. आता ते स्वगृही परतल्याचे समाजसेवा अधीक्षक पारखे यांनी सांगितले.