मुख्यमंत्र्यांनी रोखले रस्ता रुंदीकरण!

By admin | Published: January 9, 2016 02:10 AM2016-01-09T02:10:51+5:302016-01-09T02:10:51+5:30

स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत रस्ते रुंदीकरणाकरिता शुक्रवारी सकाळपासून सुरु झालेली दुकाने व इमारतीवरील कारवाई दुपारी अचानक पोलीस बंदोबस्त काढून

Ramping road blocked by the Chief Minister! | मुख्यमंत्र्यांनी रोखले रस्ता रुंदीकरण!

मुख्यमंत्र्यांनी रोखले रस्ता रुंदीकरण!

Next

कल्याण : स्मार्ट सिटी प्रकल्पांतर्गत रस्ते रुंदीकरणाकरिता शुक्रवारी सकाळपासून सुरु झालेली दुकाने व इमारतीवरील कारवाई दुपारी अचानक पोलीस बंदोबस्त काढून घेतल्याने थांबवण्यात आली. मुख्यमंत्री देवेंद्र फडणवीस यांच्या कार्यालयातून दूरध्वनी आल्याने कारवाई थांबल्याची चर्चा सुरु असून गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता यांनी ही कारवाई रोखण्याकरिता आपली प्रतिष्ठा पणाला लावली होती.
स्मार्ट सिटी प्रकल्पात कल्याण रेल्वे स्थानक परिसराच्या रुंदीकरणाला व विकासाला आयुक्त ई रवींद्रन यांनी विशेष प्राधान्य दिले आहेत. त्यामुळे रेल्वे स्थानक परिसराकडे जाणारा शिवाजी चौक ते महात्मा फुले चौक या प्रमुख रस्त्याच्या रूंदीकरणाचे काम महापालिकेकडून हाती घेण्यात आले आहे. रस्त्याच्या दोन्ही बाजुकडील दुकानांच्या वाढीव बांधकामांवर हातोडा घालण्यास शुक्रवारी सकाळपासून प्रारंभ झाला. कडक पोलीस बंदोबस्त याकरिता तैनात केला होता. कारण या कारवाईला व्यापाऱ्यांनी सक्त विरोध केला होता. व्यापाऱ्यांच्या मदतीला राज्याचे गृहनिर्माणमंत्री प्रकाश मेहता धावून आले होते व त्यांनी अशी कारवाई होऊ देणार नाही, अशी घोषणा केली होती. मात्र अचानक दुपारनंतर पोलीस बंदोबस्त काढून घेतला गेला व कारवाई थांबली. कारवाई थांबली असली तरी ८० टक्के पाडकाम झाल्याचा दावा पालिका प्रशासनाने केला तर व्यापाऱ्यांनी स्वत:हून काही बांधकाम पाडण्याची तयारी दाखवल्याने कारवाई थांबली, असा दावा व्यापाऱ्यांनी केला.
इमारती, दुकाने अशा ३१२ जणांना त्यांचे बांधकाम पाडून टाकण्याच्या नोटीसा बजावण्यात आल्या होत्या. यात मोठया प्रमाणावर व्यापाऱ्यांची बांधकामे होती. त्यांनी हे रूंदीकरण थांबावे म्हणून सर्वप्रकारे प्रयत्न करून पाहिले. कारवाईच्या विरोधात व्यापाऱ्यांनी दोन दिवस दुकाने बंद ठेवली आणि निषेध प्रकट केला. त्याचवेळी मंत्री मेहता हे व्यापाऱ्यांना भेट द्यायला आले. स्मार्ट सिटी लोकांकरिता आहे की, अधिकाऱ्यांकरिता असा सवाल मेहता यांनी करीत. कारवाई होऊ देणार नाही, असा इशारा दिला होता.
आयुक्त रवींद्रन हे कारवाईवर ठाम होते. त्यांनी दबावाला बळी न पडता शुक्रवारी सकाळपासूनच ४ जेसीबी, ३ पोकलेन, २०० पोलीस कर्मचारी आणि महापालिका कर्मचारी, आठ प्रभागक्षेत्र अधिकारी असा मोठा फौजफाटा कारवाईसाठी तैनात केला होता. व्यापाऱ्यांनी हस्तक्षेप करु नये याकरिता शिवाजी चौक ते महात्मा फुले चौक हा रस्ता वाहतुकीसाठी पूर्णपणे बंद ठेवण्यात आला होता. मंत्र्यांच्या इशाऱ्यानंतरही कारवाई होणारच हे स्पष्ट झाल्याने काही व्यापाऱ्यांनी गुरूवारी रात्रीपासूनच आपली वाढीव बांधकामे स्वत:हून पाडण्यास सुरूवात केली होती.
आम्हाला रुंद रस्ते हवे अशी भूमिका पादचारी व वाहन चालक यांनी घेत आयुक्तांच्या या कारवाईचे कौतुक केले. मात्र दुपारी अडीचच्या सुमारास कारवाई थांबविण्यात आली. मुख्यमंत्री कार्यालयातून आयुक्त रवींद्रन यांना दूरध्वनी आल्याने कारवाई थांबल्याची चर्चा आहे. नगरविकास व गृह ही दोन्ही खाती मुख्यमंत्र्यांकडे असल्याने त्यांच्या कार्यालयाखेरीज हे घडले नाही, असे बोलले जाते. प्रकाश मेहता यांनी कल्याणमधील कारवाई रोखण्याकरिता आपली प्रतिष्ठा पणाला लावल्याने ती थांबली, असेही बोलले जाते.

Web Title: Ramping road blocked by the Chief Minister!

Get Latest Marathi News , Maharashtra News and Live Marathi News Headlines from Politics, Sports, Entertainment, Business and hyperlocal news from all cities of Maharashtra.