उल्हासनगरात विकासकामावरून रंगला श्रेयवाद, रुग्णालयातील कामाचे दुसऱ्यांदा भूमिपूजन
By ऑनलाइन लोकमत | Published: January 10, 2022 05:41 PM2022-01-10T17:41:39+5:302022-01-10T17:42:13+5:30
उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात कर्जत, कसारा, मुरबाड, शहापूर, बदलापूर, अंबरनाथ, कल्याण ग्रामीण भागातून शेकडो रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात.
सदानंद नाईक
उल्हासनगर : मध्यवर्ती रुग्णालयातील अंतर्गत रस्ते, लिफ़्ट, शस्त्रक्रिया विभाग, रुग्णालयाचे नूतनीकरण आदी विकास कामाचे भूमिपूजन गेल्या महिन्यात राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा पंचम कलानी यांच्या हस्ते झाल्यानंतर, पुन्हा त्याच कामाचे भूमिपूजन सोमवारी आमदार कुमार आयलानी, शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी यांच्या हस्ते झाल्याने आश्चर्य व्यक्त होत आहे. आयलानी व कलानी मध्ये पुन्हा श्रेयवाद रंगल्याचे बोलले जात आहे.
उल्हासनगरातील मध्यवर्ती रुग्णालयात कर्जत, कसारा, मुरबाड, शहापूर, बदलापूर, अंबरनाथ, कल्याण ग्रामीण भागातून शेकडो रुग्ण उपचार घेण्यासाठी येतात. बाह्यरुग्ण विभागाची दररोजची संख्या एक हजारा पेक्षा जास्त असून गरीब व गरजू नागरिकांचे आशेचे स्थान रुग्णालय राहिले आहे. रुग्णालयातील अंतर्गत रस्ते, शस्त्रक्रिया विभाग, रुग्णालयाचे नूतनीकरण, नवीन दोन लिफ़्ट, शवागृहाचे काम आदी विकास कामाचे भूमिपूजन राष्ट्रवादी पक्षाच्या शहराध्यक्षा पंचम कलानी यांच्या हस्ते व रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुधाकर शिंदे यांच्या उपस्थितीत गेल्या महिन्यात झाले. या विकास कामाच्या भूमिपूजनावरून आमदार कुमार आयलानी यांनी पत्रकार परिषद घेऊन, भूमिपूजन केलेली सर्व विकासकामे माझ्या पाठपुराव्यामुळे व आमदार निधीतील सांगितले होते. तर कलानी यांनी आरोग्यमंत्र्यांकडे विकास कामाबाबत पाठपुरावा केल्याचे म्हटले होते.
राष्ट्रवादीच्या शहराध्यक्षा पंचम कलानी यांनी केलेल्या विकास कामाचे भूमिपूजन पुन्हा सोमवारी आमदार कुमार आयलानी यांच्या हस्ते व भाजप शहराध्यक्ष जमनुदास पुरस्वानी, रुग्णालयाचे जिल्हा शल्यचिकित्सक डॉ सुधाकर शिंदे यांच्या उपस्थितीत झाले. एकाच विकास कामाचे भूमिपूजन दुसऱ्यांदा झाल्याने, आश्चर्य व्यक्त होत आहे. विकास कामाच्या श्रेयासाठी आयलानी व कलानी आमने सामने आल्याचे बोलले जात आहे. तर भूमिपूजन वेळी आयलानी यांनी रुग्णालयाच्या मागील खुल्या भूखंडावर नवीन अद्यावत सुखसुविधायुक्त ३०० बेडच्या रुग्णालयाची इमारत उभी करण्याची तसेच नर्सिंग कॉलेज बांधण्याची मागणी शासनाकडे केली. असे आयलानी म्हणाले. एकूणच आयलानी व कलानी मध्ये पुन्हा श्रेयवादावरून वाद उभा राहण्याची शक्यता व्यक्त होत आहे