बदलापुरात हजारो नागरिकांच्या उपस्थितीत रंगला भीम महोत्सव
By ऑनलाइन लोकमत | Published: January 29, 2019 12:47 AM2019-01-29T00:47:07+5:302019-01-29T00:47:32+5:30
रसिकांचा उत्साह शिगेला; कडूबाई खरात, आदर्श शिंदे यांचे दमदार सादरीकरण, बुद्धवंदनेने कार्यक्रमाचा शुभारंभ
बदलापूर : प्रगतीशील बौद्ध समाज, बदलापूर शहर आणि ग्रामीण यांच्या वतीने आयोजित ‘भीम महोत्सव’ रविवारी बदलापूर शहरात जल्लोषात साजरा झाला. ग्रामीण भागातून आलेल्या कडुबाई खरात आणि गायक आदर्श शिंदे यांनी आपल्या खड्या आवाजातील गाण्यांनी उपस्थितांची मने जिंकली. तर प्रा. अमोल मिटकरी यांनी ‘संविधान बचाव’साठी केलेल्या आवाहनपर आवेशपूर्ण भाषणालाही प्रेक्षकांनी दाद दिली. या महोत्सवाला हजारोच्या संख्येने बदलापूर उपस्थित होते.
प्रवीण राऊत यांच्या पुढाकाराने ‘भीम महोत्सवा’चे आयोजन बदलापूर पश्चिमेकडील घोरपडे मैदानात करण्यात आले होते. बुद्ध वंदनेने या महोत्सवाचा शुभारंभ करण्यात आला. कडूबाई खरात यांनी ‘माझ्या नावाचं कुंकू लाविलं रमानं’ आणि ‘तुम्ही खाता त्या भाकरीवर बाबासाहेबांची सही हाय’ ही गाणी सादर करून महोत्सव दणाणून सोडला. ग्रामीण भागातील या महिला कलाकाराने प्रेक्षकांची मने जिंकली. त्यानंतर महोत्सव रंगला तो प्रसिद्ध गायक आदर्श शिंदे यांच्या भीमगीतांना. आपल्या खड्या आवाजात डॉ. बाबासाहेब आंबेडकर यांच्या जीवनावर आधारित गाणी सादर केली. ‘गुलामी का तूट गया जाल, भिकारी बन गया मालामाल, ये है मेरे भीम की कमाल’, ‘माझ्या भिमाची पुण्याई’ मुळशी पॅटर्न मधील गाणं ‘जी एस टी च्या फेऱ्यात काळा पैसा होईना गोरा’, ‘नव्हतं मिळत पोटाला, आता कमी नाही नोटाला’ अशी एकापेक्षा एक गाणी त्यांनी सादर केली. उपस्थित रसिकांच्या मागणीमुळे कार्यक्र माच्या अखेरीस आदर्श शिंदे यांनी भीमा कोरेगावचे त्यांचे प्रसिद्ध गाणे सादर केले. ‘भीत नाही कोणाच्या बापाला, ही भिमाची पोरं’ हे गाणं सादर केले.
या महोत्सवाच्या मध्यांतरात अॅड. संगीता फड यांच्यासह बदलापूरातील सामाजिक आणि क्रीडा क्षेत्रातील मान्यवरांचा सत्कार करण्यात आला. महोत्सवाचे नियोजन उत्तम असल्याने कोणताही गोंधळ झाला नाही. आनंद घेता आला. कोणताही अनुचित प्रकार घडणार नाही याची काळजी घेण्यात आली होती.
यावेळी माजी नगराध्यक्ष वामन म्हात्रे यांनी बदलापुरातील अर्धवट अवस्थेत असलेल्या आंबेडकर स्मारकासाठी पालिका येत्या अर्थसंकल्पात ८ कोटींची तरतूद करणार असल्याचे स्पष्ट केले. हे स्मारक येत्या वर्षभरात कोणत्याही परिस्थितीत पूर्ण केले जाईल असे त्यांनी स्पष्ट केले. तर राजन घोरपडे यांनी देखील स्मारकाच्या विषयाला धरुनच पालिकेसोबत शासनाच्या निधीचाही वापर या कामासाठी करुन स्मारक आणखी भव्य कसे होईल, याचा विचार सुरू असल्याचे सांगितले. कार्यक्रमाचे आयोजक प्रवीण राऊत यांनी आंबेडकरी विचाराला एकत्रित करुन बदलापूर शहराच्या विकासासाठी त्याचा योग्य वापर करण्याचे सांगितले. या कार्यक्रमाला राजकीय आणि कला क्षेत्रातील अनेक मान्यवरांनी उपस्थिती लावली होती.
आंदोलन केले नाही त्यांना आरक्षण- प्रा. अमोल मिटकरी
भीम महोत्सवाला संविधान बचाव समितीचे प्रा. अमोल मिटकरी हे देखील उपस्थित होते. यावेळी त्यांनी आपल्या मनोगतात संविधान धोक्यात असल्याचे मत व्यक्त केले. आपल्या देशात आपलेच संविधान जाळले जाते. आम्ही बुध्दाचे उपासक आहोत म्हणून शांतता ठेवली आहे.
अन्यथा संविधान जाळणाºयांना त्यांची जागा दाखवली असती. आज देश ज्या परिस्थितीतुन पुढे जात आहे ती संविधानासाठी घातक आहे. येत्या तीन महिन्यात आपल्याला संविधान वाचवण्यासाठी प्रखर लढा उभा करायचा आहे आणि त्यासाठी आम्ही सर्व धोके पत्करून लढत आहोत.
या शहरात विचाराचे उपासक आहेत हे पाहून मनाला समाधान झाले असेही मिटकरी म्हणाले. सरकारवर टीका करताना ते पुढे म्हणाले ज्याच्या घरी शस्त्र साठा सापडतो त्यांना एका दिवसात जामीन मिळतो. आणि मनुवादाचे समर्थकांना पुरस्कार मिळतो. कालचा सूर्य त्यांचा होता तर उद्याचा सूर्य हा बहुजनांचा असेल त्या साठी जागे रहा,आणि जागे व्हा, असे कळकळीचे आवाहन मिटकरी यांनी आपल्या भाषणाच्या अखेरीस केले.