उल्हासनगरच्या शेवटच्या महासभेत रंगला माफी डे
By admin | Published: March 19, 2017 05:40 AM2017-03-19T05:40:01+5:302017-03-19T05:40:01+5:30
उल्हासनगर महापालिकेच्या शेवटच्या महासभेत महापौरांसह नगरसेवकांनी सर्वांची माफी मागत ‘माफी डे’ साजरा केला. कारण तसेच होते, महापालिकेच्या निवडणुका
उल्हासनगर : उल्हासनगर महापालिकेच्या शेवटच्या महासभेत महापौरांसह नगरसेवकांनी सर्वांची माफी मागत ‘माफी डे’ साजरा केला. कारण तसेच होते, महापालिकेच्या निवडणुका झाल्या असल्या; तरी जुन्या नगरसेवकांचा कालावधी ५ एप्रिलला संपणार आहे. त्यामुळे नियमानुसार जुन्या नगरसेवकांची महासभा झाली. पण त्यात धोरणात्मक निर्णय घ्यायचे नसल्याने झाली ती आभाराची भाषणे. गेल्या पाच वर्षात घडलेल्या चुकांबद्दल माफी मागण्यासाठी महापौर, उपमहापौर आणि नगरसेवकांन्त जणू स्पर्धा लागली आणि सॉरी, सॉरी म्हणत प्रत्येकाने झाले गेले विसरून जाण्याचे भावपूर्ण आवाहन केले.
राज्यातील इतर नऊ महापालिकांसोबत उल्हासनगरची निवडणूक फेबु्रवारी महिन्यात पार पडली. ५ एप्रिलला महापौरांची निवड होणार आहे. तोवर जुन्याच नगरसेवकांचा कालावधी सुरू राहणार आहे. त्यामुळे नियमानुसार त्यांची मार्च महिन्याची महासभा मावळत्या महापौर अपेक्षा पाटील यांनी बोलावली. जुन्या नगरसेवकांपैकी ४० टक्के नगरसेवक पराभूत झाले आहेत किंवा त्यांनी निवडणूक लढविलेली नाही. त्यांच्यासाठी ही महासभा अखेरची होती.
त्यात महापौर अपेक्षा पाटील, उपमहापौर पंचशीला पवार, नगरसेवक मनोज लासी, प्रदीप रामचंदानी, बी. बी. मोरे, शिवसेनेचे नगरसेवक विजय सुफाळे, स्रेहा भोईर, काँग्रेसच्या पिंकी उदासी, भाजपाचे राम चार्ली आधींची ही शेवटची महासभा होती.
महापालिका निवडणुका झाल्याने, जुन्या नगरसेवकांना महासभेत धोरणात्मक आणि आर्थिक महत्वाचे निर्णय घेता येत नसल्याचे परिपत्रक शासनाने काढले. त्यामुळे महासभेला उपस्थित असलेल्या नगरसेवकांनी, महापौर अपेक्षा पाटील, उपमहापौर पंचशीला पवार यांनी गेल्या पाच वर्षात आमच्याकडून कोणाचे मन दुखवले असेल, तर त्याबद्दल माफी मागितली. त्यात पालिका अधिकारी, सहकारी नगरसेवक, पत्रकार आणि नागरिकांचीही जाहीर माफी मागण्यात आली. महापौर अपेक्षा पाटील यांनी माझ्याकडून काही चुका होऊन कुणाची मने दुखावली असतील, तर मी माफी मागते, असे सांगत सहकार्य केल्याबद्दल सर्वांचे आभार मानले.
उपमहापौर पंचशीला पवार माफी मागताना भावनिक झाल्या होत्या. गेल्या २० वर्षापासून राजकारणात असल्याने आणि महापालिकेच्या महासभा पाहात असल्याचे सांगून जनकल्याणासाठी असे सहकार्य यापुढेही करा, अशी विनंती त्यांनी केली. इतर नगरसेवकांनीही मग माफी मागण्याचा हा सिलसिला सुरू ठेवल्याने महासभेला ‘माफी डे’ चे स्वरूप आले. (प्रतिनिधी)
कलानी, इदनानी, बोडारे यांची दांडी
महापालिकेच्या महासभेत ६० टक्क्यांपेक्षा जास्त नगरसेवकांनी दांडी मारली. यात आमदार आणि नगरसेवक ज्योती कलानी, ओमी कलानी, जया साधवानी, अंजली साळवे, माजी महापौर राजश्री चौधरी, सेनेचे सभागृह नेते धनंजय बोडारे, गटनेते रमेश चव्हाण, सुभाष मनसुलकर, साई पक्षाचे जीवन इदनानी, माजी महापौर आशा इदनानी, रिपाइंचे भगवान भालेराव, बसपाचे विजय तायडे, सुरेश जाधव, टोनी सिरवानी आदी नगरसेवकांचा समावेश होता.