अभिनय कट्टयावर रंगला संगीत कट्टा आयोजित कराओके गायन स्पर्धेचा पारितोषिक वितरण सोहळा
By लोकमत न्यूज नेटवर्क | Published: January 20, 2020 05:03 PM2020-01-20T17:03:09+5:302020-01-20T19:44:38+5:30
अभिनय कट्ट्याच्या संगीत कट्ट्यावर प्रत्येक वयोगटातील गायक कलाकार आपली गायन कला सादर करीत असतात.
ठाणे : दरवर्षी प्रमाणे यंदाही हिंदुहृदयसम्राट बाळासाहेब ठाकरे व धर्मवीर आनंद दिघे यांच्या जयंती निमित्त अभिनय कट्ट्याच्यासंगीत कट्टा करओके गायन स्पर्धा २०२० चे आयोजन करण्यात आले. शनिवारी यावर्षीच्या स्पर्धेला सुरुवात झाली. रविवारी पारितोषिक वितरण सोहळा रंगला. वयवर्षे ५० व पुढील वयोगटातील स्पर्धकांपैकी सुप्रिया यांदे पिया तो से नैना लागे यांना प्रथम परितोषिक तर ३५ ते ५० या वयोगटात चाहुगा मै तुझे प्रथम क्रमांक प्रेमकुमार सिंह यांनी पटकावला.
शिवसेना सचिव विलास जोशी, ज्येष्ठ माजी नगरसेवक भास्कर पाटील व ज्येष्ठ गायकांच्या हस्ते दीपप्रज्वलन करून तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या पुतळ्याला पुष्पहार अर्पण करून व बाळासाहेबांच्या, आनंद दिघेच्या तस्वीरीला पुष्पहार अर्पण करून स्पर्धेला सुरुवात झाली. दिलीप नारखेडे ह्यांच्या इक दिन बीक जयेगा ह्या गाण्याने सुरुवात झाली. वयवर्षे ५० व पुढील आणि ३५ ते ५० अशा दोन वयोगटात स्पर्धा घेण्यात आली. ५० व पुढील वयोगटातील एकूण ५० स्पर्धकांनी सहभाग घेतला तर ३५ ते ५० वयोगटातील २५ स्पर्धकांनी सहभाग घेतला. एकूणच स्पर्धेपेक्षा या सर्वच ज्येष्ठ गायकांना गाणं सादर करून जो आनंद मिळाला समाधान मिळालं ह्यावरूनच या स्पर्धेचे यश दिसून आले. त्यात अनेक अशी उदाहरण होती जी स्पर्धकाला कितीही गंभीर आजार असला तरीही त्यावर मात करून आपलं गाणं सादर करण्याची अनेक उदाहरण या स्पर्धे दरम्यान अनुभवता आली. खरतर ही स्पर्धा अतिशय अतीतटीची झाली कारण प्रत्येक स्पर्धकांनी आपल उत्तम गाण सादर केल. ७७ वर्षाच्या प्रतिभा कुलकर्णी ह्यांनी उमराव जान मधील दिल चीज कया है सादर करताना जो सुर लावला त्याने रसिक भारावून गेले. त्यांना ह्या स्पर्धेचे विशेष उल्लेखनीय परितोषिक देण्यात आले. जिंदगी का सफर या गाण्यासाठी सुरेश राजगुरू यांना द्वीतीय, ओ जानेवाले साठी व्यंकटेश कुलकर्णी यांना तृतीय, मेरे देश की धरती या गाण्यासाठी संतोष जाधव यांना चौथे परितोषिक, ओ मेरे दिल के चैन ला अजय नाईक यांना पाचवे परितोषिक तसेच मनोज अहिरे , प्रभात कुलकर्णी, गोविंद भानुशाली, प्रवीण शहा, रमेश तेलुरे, यांना उत्तेजनार्थ परितोषिक, सन्मानपत्र, व धनादेश स्वरुपात देण्यात आले. त्याच प्रमाणे वयवर्षे ३५ ते ५० या वयोगटात साजणी बाई द्वितीय क्रमांक भारती बच्छाव, कूछ ना कहो साठी दत्ता रक्षक यांना तृतीय क्रमांक तर कितने भी तू करले सितम साठी यशवंत कालेकर यांना चौथा क्रमांक, रजनी खेडेकर यांना ये दिल उनके निगहोके या गाण्यासाठी पाचव्या क्रमांकाचे तसेच संदीप गुप्ता व योगिता पाटील यांना उत्तेजनार्थ परितोषिक देण्यात आले. एकूणच ह्या स्पर्धकांचा उत्साह पाहता अभिनय कट्ट्यावरील हा बक्षीस समारंभाचा कार्यक्रम उत्साहात साजरा झाला. आजचा आघाडीचा गायक सुर नवा ध्यास नवा फेम श्रीरंग भावे यांची प्रमुख उपस्थिती या बक्षिस समारंभाला लाभली. श्रीरंग भावेच्या दहा मिनिटांच्या मेडलीने संपूर्ण कट्टा दुमदुमला. या स्पर्धेसाठी उप महापौर पल्लवी कदम, विभाग प्रमुख दीपक म्हसके, उपविभाग प्रमुख राजू मोरे, विजय डावरे, मधुकर गिजे, बाळा जाधव व इतर मान्यवर उपस्थित होते. ही स्पर्धा आणि अर्थातच संगीत कट्टा हा ज्येष्ठना खर्या अर्थाने आजार निवारण केंद्राचे काम करतोय. कारण अगदी गंभीर आजारावर मात करत अनेक ज्येष्ठ आपल गाण सादर करण्यासाठी दर शुक्रवारी अभिनय कट्ट्याच्या या संगीत कट्ट्यावर येत असतात. हेच खरतर या चळवळीचे यश आहे. असे मत किरण नाकती यांनी व्यक्त केले. बाळासाहेब ठाकरे व आनंद दिघे यांच्या जयंती निमित्त होणारी ही स्पर्धा म्हणजे खर्या अर्थाने आनंदाचे किरण असे ह्या संगीत कट्यावर पसरत राहो असे मत श्रीरंग भावे यांनी व्यक्त केले.या स्पर्धा फेरीचे निवेदन शुभांगी भालेराव यांनी तर बक्षीस समारंभाच्या कार्यक्रमाचे निवेदन माधुरी कोळी यांनी केले.