ठाण्यात रांगोळीतून अवतरले रंगरामायण
By प्रज्ञा म्हात्रे | Published: April 6, 2024 05:42 PM2024-04-06T17:42:40+5:302024-04-06T17:46:10+5:30
ठाण्यात पुन्हा एकदा रंगरामायण अवतरले असून रामभक्तांना रामजन्म ते आयोध्यावापसीपर्यंतचा प्रवास रांगोळीतून पाहता येणार आहे.
प्रज्ञा म्हात्रे, ठाणे : ठाण्यात पुन्हा एकदा रंगरामायण अवतरले असून रामभक्तांना रामजन्म ते आयोध्यावापसीपर्यंतचा प्रवास रांगोळीतून पाहता येणार आहे. गुढीपाडव्यानिमित्त श्री कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यासाच्यावतीने आयोजित स्वागतयात्रेनिमित्त या पोट्रेट रांगोळ्या रेखाटल्या आहेत. रामायणमधील २१ महत्त्वाचे प्रसंग हे रंगरामायणातून दाखविण्यात आले आहेत. २१ कलाकारांनी ४ दिवस ४ रात्र या कालावधीत हे रंगरामायण रेखाटले आहे.
रमचारीत्रावर आधारित रामपट हा रांगोळीतून पाहण्याजोगा आहे. रामायणातील निवडक २१ प्रसंग जसे ती, रामजन्म, रामाचे शिक्षण, सीतेचे स्वयंवर, रामाचा वनवास, भरत भेट, सीता हरण, रामाने कापलेले शुर्पणखेचे नाक, लंका दहन, सेतू बंधन, कुंभकर्ण, संजीवनी घेऊन जाताना हनुमान, रावण वध आणि शेवटी आयोध्या आगमन या रंगरामायणातून पाहायला मिळत आहे. कौपिनेश्वर सांस्कृतिक न्यास आयोजित गुढीपाडवानिमित विविध कार्यक्रमांचा भाग म्हणून रंगवल्ली परिवार ठाणेच्यावतीने रामचरित्र रामायणावर आधारित चित्र संगोळ्या "रंग रामायण", (पोर्ट्रेट रांगोळी) रेखाटल्या आहेत.
ठाणे महानगरपालिकेच्या विष्णूनगर येथील १९ नंबर शाळेच्या दालनात ह्या भव्य प्रदर्शनाचे उद्घाटन ६ एप्रिल रोजी आंतरराष्ट्रीय ख्यातीचे चित्रकार विजयराज बोधनकर यांच्याहस्ते करण्यात आले आहे. तसेच छत्रपती शिवाजी महाराजांच्या आरमाराच्या प्रतिकृतींची मांडणी ह्या प्रदर्शनात पाहायला मिळत आहे. याआधी २० जानेवारी ते २२ जानेवारी २०२४ या कालावधीत "अयोध्या येथील श्री राम मंदिर" च्या "लोकार्पण" निमित्त "रामायण महोत्सव" गावदेवी मैदान ठाणे येथे आयोजित केला होता. ६ एप्रिल ते १० एप्रिल या कालावधीत सकाळी १० ते रात्री ९ या कालावधीत रसिकांना हे रंगरामायण पाहता येणार आहे.