गजऱ्यापेक्षा राणीहार परवडला; मोगरा तीन हजार रुपये किलो!
By ऑनलाइन लोकमत | Published: October 20, 2023 09:40 AM2023-10-20T09:40:50+5:302023-10-20T09:41:28+5:30
फुलांनाही महागाईची झळ, गुलछडीची कंठी, शेवंतीच्या वेणीने खाल्ला भाव, दसऱ्याला झेंडू महागणार
लोकमत न्यूज नेटवर्क
ठाणे : ऐन नवरात्रोत्सवात फुलांचे भाव वाढू लागतात. पंचमीपासून या दरामध्ये आणखी वाढ होत असते. ठाण्याच्या बाजारातही गुरुवारपासून वेण्या आणि रंगीबेरंगी फुलांना महागाईची झळ बसली आहे. गुलछडीची कंठी, शेवंतीची वेणी आणि मोगऱ्याच्या दराने भाव खाल्ला आहे. मोगरा चक्क तीन हजार रुपये किलोने मिळत आहे. त्यामुळे मोगऱ्याचे दर या नवरात्रोत्सवात गगनाला भिडले आहेत. दुसरीकडे झेंडूचे दर मात्र कमी आहेत. दसऱ्याला झेंडूचे दर वाढतील, असे फूलविक्रेत्यांनी सांगितले.
भक्तांच्या खिशाला पडते चाट
सणासुदीला फुलांच्या किमतीत वाढ होतेच. यावेळेस नवरात्रोत्सवात गजरा आणि वेणीमध्ये पाच ते दहा रुपयांनी वाढ झाली आहे. घरोघरी घट बसविणाऱ्या आणि मंडळांमध्ये देवीच्या दर्शनासाठी जाणाऱ्या भक्तांना जास्त पैसे मोजावे लागत आहेत.
ठाण्याच्या बाजारपेठेत महाराष्ट्रातील ग्रामीण आणि आदिवासी भागांतून महिला विक्रेत्या आल्या आहेत. पोटा पाण्यासाठी चार पैसे अधिक मिळतील, या उद्देशाने ही गोरगरीब मंडळी येत असतात.
जांभळी मार्केट येथे या महिला विक्रेत्या जास्त संख्येने दिसून येत आहेत. पुणे, नारायणगाव, जुन्नर याप्रमाणे दक्षिण भागांतून फुलांची आवक होते. वसईचा मोगरा प्रसिद्ध असल्याने तेथून मोठ्या प्रमाणात मोगरा येत असल्याचेही विक्रेते म्हणाले.
सप्तमी आणि अष्टमीला रंगीत फुलांची मागणी असते. अष्टमी आणि नवमीला हवन केले जाते. त्यामुळे या दोन दिवसांत देवीची ओटी भरायला प्रचंड गर्दी असते. त्यामुळे वेणी आणि रंगीत फुलांची खरेदी मोठ्या प्रमाणात होत असते. या दिवसांत ओटीचे दरही वाढलेले असतात. अष्टमीसाठी वेण्यांच्या ऑर्डर सुरू झाल्या आहेत.
- राजेश रावळ,
फूलविक्रेते
फुले आणि वेण्यांचे दर
पिवळा आणि कलकत्ता गोंडा ८० ₹ कि.
गुलछडी २५० ₹ कि.
गुलछडीची कंठी ५०० ₹ कि.
पिवळी आणि सफेद शेवंती २०० ₹ कि.
पर्पल शेवंती २५० ₹ कि.
गुलाब २०० ₹ कि.
चाफा १० ₹ नग
मोगरा ३००० ₹ कि.
मोगऱ्याचा गजरा ३० ₹ नग
निशिगंधा आणि जुईचा गजरा २५ ₹ कि.
अष्टर २५० ₹ कि.